वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि २७२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयाबरोबर दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. हा सामना केवळ तीन दिवसांत संपला. त्यातही सुमारे दीड दिवस भारताने एक डाव फलंदाजी केली. आणि उर्वरित कालावधीत विंडीजच्या संघाचे दोन डाव संपुष्टात आले. भारताने पहिला डाव ६४९ धावा करून अखेर घोषित केला. पण विंडीजच्या संघाला दोन्ही डावात मिळूनही तितकी धावसंख्या उभारता आली नाही.

विंडीजच्या या सुमार कामगिरीवर सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग यानेही खोचकपणे विंडीज संघाच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले. मात्र या खोचक ट्विटचा विंडीजचा खेळाडू टिनो बेस्ट याच्याकडून खरपूस समाचार घेण्यात आला.

विंडीज संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर हरभजनने ट्विट केले होते. ‘विंडीज संघाचा मान राखून मी प्रश्न विचारू इच्छितो की विंडीजचा हा संघ रणजी करंडकाच्या प्लेट गटातून उपांत्यपूर्व फेरीत आला आहे का? कारण एलिट खेळाडूंकडून अशा पद्धतीची कामगिरी अपेक्षित नाही’, असा खोचक सवाल त्याने उपस्थित केला होता.

यावर टिनो बेस्ट याने खरोखरच ‘बेस्ट’ रिप्लाय देत हरभजनला चपराक लगावली. ‘इंग्लंड दौऱ्यात (तुझ्याकडून) असे खोचक ट्विट करण्यात आले नव्हते…. असो! विंडीजचा नवा संघ लवकरच शिकून प्रगती करेल’, असे ट्विट करत त्याने हरभजनला ‘क्लीन बोल्ड केले.

दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते.

Story img Loader