India vs West Indies ODI Series: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिल्यानंतर भारतीय संघाने कसोटी मालिका १-०ने जिंकली. आता दोन्ही संघ २७ जुलैपासून बार्बाडोस येथे तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत आमनेसामने येतील. भारतीय संघाची या एकदिवसीय मालिकेसाठी आधीच घोषणा करण्यात आली होती. आता वेस्ट इंडिजने कसोटी मालिका पूर्ण झाल्यानंतर एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी वेस्ट इंडिजने संघाची घोषणा केली आहे. शिमरॉन हेटमायर आणि वेगवान गोलंदाज ओशाने थॉमस यांचे वन डे संघात पुनरागमन झाले आहे. मात्र, एवढ्या महत्त्वाच्या संघाविरुद्ध मालिका असताना क्रिकेटचे महत्त्वाचे वरिष्ठ खेळाडू हे मेजर टी२०लीग खेळण्यात व्यस्त असून त्याला त्यांनी पहिले प्राधान्य दिले आहे. यातर माजी कर्णधार निकोलस पूरन आणि अष्टपैलू जेसन होल्डर यांचा समावेश आहे. या दोन खेळाडूंऐवजी वेगवान गोलंदाज जेडेन सील्स आणि यानिक कारिया यांना १५ सदस्यीय संघात स्थान मिळाले आहे.

१५ सदस्यीय वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व शाई हॉप करणार आहे. सध्या एमआय न्यूयॉर्ककडून मेजर लीग क्रिकेटमध्ये खेळत असलेला पूरन अष्टपैलू जेसन होल्डरसह तीन एकदिवसीय सामन्यांसाठी अनुपलब्ध असेल. दुसरीकडे, डावखुरा शिमरॉन हेटमायर, दोन वर्षांत पहिला एकदिवसीय सामना खेळणार आहे, तो टी२० विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर प्रथमच राष्ट्रीय संघात परतला आहे. जेडेन सील्स आणि यानिक कारिया हे दोघेही दुखापतीमधून पुनरागमन करत आहेत, तर डावखुरा फिरकी गोलंदाज गुडाकेश मोती यालाही दुखापतीतून सावरल्यानंतर संघात स्थान मिळाले आहे.

दुखापतग्रस्त अष्टपैलू खेळाडू कीमो पॉलला संधी देण्यात आली नाही, दुसरीकडे हेटमायर आणि थॉमस गेल्या काही काळापासून वेस्ट इंडिजच्या वनडे सेटअपमधून बाहेर होते. दोघेही जवळपास दोन वर्षांपूर्वी या फॉरमॅटमध्ये शेवटचे खेळले होते. मुख्य निवडकर्ते डेसमंड हेन्स म्हणाले, “आम्ही थॉमस आणि हेटमायरचे एकदिवसीय संघात स्वागत करतो. दोघांनी यापूर्वी या फॉरमॅटमध्ये यश मिळवले आहे. आम्हाला विश्वास आहे की ते सेटअपमध्ये चांगली कामगिरी करतील.”

हेही वाचा: Sunil Gavaskar: विराट-रोहितच्या जागी तरुणांना का संधी देत नाहीत? गावसकरांचा संतप्त सवाल; म्हणाले, “विंडीजविरुद्ध धावा केल्याचा…”

“ओशानेकडे वेग असल्याने तो नवीन चेंडूवर विकेट घेणारा आमचा प्रमुख गोलंदाज आहे. फलंदाजीत हेटमायरची शैली आम्हाला मधल्या षटकांमध्ये खूप मदत करेल आणि तो एक संभाव्य ‘फिनिशर’ देखील आहे,” हेन्स म्हणाले. भारतात आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता गमावल्यानंतर वेस्ट इंडिजला त्यांच्या ५० षटकांच्या सामन्यात सुधारणा करावी लागेल. २७ जुलैपासून सुरू होणार्‍या मालिकेतील पहिले दोन सामने बार्बाडोसच्या किंगस्टन ओव्हलवर खेळवले जातील. यानंतर, दोन्ही संघ १ ऑगस्टला त्रिनिदादला जातील, जिथे तिसरा एकदिवसीय सामना ब्रायन लारा क्रिकेट अकादमीत खेळवला जाईल.

दोन्ही संघाचे खेळाडू

वेस्ट इंडिज संघ: शाई होप (यष्टीरक्षक/कर्णधार), रोव्हमन पॉवेल (उपकर्णधार), अ‍ॅलिक अथनाझ, यानिक कारिया, केसी कार्टी, डॉमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्झारी जोसेफ, ब्रॅंडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोती, जेडेन सील्स, रोमॅरियो शेफर्ड, केविन सिंक्लेअर, ओशान थॉमस, डेनिस बुली, रोस्टन चेस, मॅकेनी क्लार्क, क्वाम हॉज, जैर मॅककॅलिस्टर, ओबेद मॅककॉय, केविन विकहॅम

हेही वाचा: WTC Points Table: भारत-वेस्ट इंडीज दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाल्याने पाकिस्तान खुश! काय आहे WTCचे समीकरण? जाणून घ्या

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र यादव, कुलदीप यादव, जयदेव उनादकड, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs wi west indies announced odi team against india return of this dangerous batting avw