India vs West Indies 2nd T20 Live Score Update: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील टी२० मालिकेतील दुसरा सामना ६ ऑगस्ट रोजी संपन्न झाला. प्रॉव्हिडन्स स्टेडियम, गयाना येथील मैदानात निकोलस पूरनने तुफानी फटकेबाजी करत वेस्ट इंडीजच्या विजयाचा पाया रचला. टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर आता सलग दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया चारीमुंड्या चीत केले. आजच्या विजयाने वेस्ट इंडीजने सलग दोन सामने एकाचा मालिकेत जिंकत नवीन विक्रम प्रस्थापित केला.
रोमहर्षक सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर दोन विकेट्सने मात केली. यासह कॅरेबियन संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने सात गडी गमावून १५२ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने १८.५ षटकांत आठ गडी गमावून १५५ धावा केल्या आणि सामना दोन गडी राखून जिंकला.
१५३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात हार्दिक पांड्याने ब्रेंडन किंग आणि चार्ल्सला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अर्शदीप सिंगने काइल मायर्सला बाद करून वेस्ट इंडिजला तिसरा धक्का दिला. हार्दिकने पॉवेल आणि पूरणची भागीदारी तोडली, पॉवेल १९ चेंडूत २१ धावा करून बाद झाला. दुसर्या डावात पूरनच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे एका टप्प्यावर वेस्ट इंडिज सहज लक्ष्याचा पाठलाग करेल असे वाटत होते, परंतु तो बाद झाल्यानंतर युझवेंद्र चहलने १६व्या षटकात तीन बळी घेत सामन्याला कलाटणी दिली. वेस्ट इंडिजला आठ गडी गमावून तीन षटकांत २१ धावांची गरज होती, मात्र त्यानंतर चहलला चेंडू मिळाला नाही आणि वेस्ट इंडिजने सात चेंडू राखून सामना जिंकला.
चहलने सामन्याला कलाटणी दिली
शिमरॉन हेटमायरला बाद करून युजवेंद्र चहलने सामन्याचे चित्र फिरवले होते. त्याने हेटमायरला विकेट्ससमोर पायचीत केले. हेटमायरने एक षटकार आणि एक चौकार मारला. त्याने २२ चेंडूत २२ धावा केल्या. मात्र, अकील हुसेन आणि अल्झारी जोसेफ यांनी वेस्ट इंडीजला सामना जिंकवून देण्यात मोलाची भूमिका पार पाडली.
तत्पूर्वी, वेस्ट इंडिज विरुद्ध गयाना येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या टी२० मध्ये प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकात ७ गडी गमावून १५२ धावा केल्या. भारताकडून दुसरा सामना खेळताना तिलक वर्माने सर्वाधिक ५१ धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजकडून अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ आणि रोमॅरियो शेपर्ड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात पुन्हा एकदा खराब झाली. संघाचा सलामीवीर शुबमन गिल ९ चेंडूत ७ धावा करून बाद झाला. तो बाद झाल्यानंतर पुढच्याच षटकात सूर्यकुमार यादव धावबाद झाला. सूर्यकुमारला ३ चेंडूत एकच धाव करता आली. इशान किशन आणि तिलक यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला पण संथ गतीने धावा काढताना दिसले. इशान किशन २३ चेंडूत २७ धावा करून क्लीन बोल्ड झाला. संजू सॅमसन खराब शॉट खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने ७ धावा केल्या. दरम्यान, टिळक वर्माने आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. ४१ चेंडूत ५१ धावा करून तो बाद झाला.
दोन्ही संघांची प्लेईंग ११
वेस्ट इंडीज: ब्रँडन किंग, काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोमॅरियो शेफर्ड, जेसन होल्डर, अकील हुसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅककॉय.
भारत: इशान किशन (विकेटकीपर), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार, रवी बिश्नोई.