India vs West Indies: भारताविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाने तयारी सुरू केली आहे. क्रिकेट वेस्ट इंडिजने शुक्रवारी तयारी शिबिरासाठी १८ खेळाडूंची निवड केली आणि त्यांना सराव करण्याचा सल्ला दिला. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत क्रेग ब्रॅथवेट विंडीज संघाचे नेतृत्व करणार आहे. तयारी शिबिरासाठी त्याची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. अँटिग्वा येथील सीसीजी येथे शुक्रवारपासून शिबिर सुरू होणार असून संघ तयारीला सुरुवात करेल. मात्र, कसोटी मालिकेसाठी विंडीजचा संघ अद्याप जाहीर झालेला नाही. संघाची घोषणा झाल्यानंतर विंडीजचा संघ ९ जुलै रोजी डॉमिनिकाला जाणार आहे. त्याच वेळी, १२ जुलैपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिली कसोटी खेळली जाणार आहे.
भारताविरुद्धची दुसरी कसोटी २० जुलैपासून त्रिनिदादच्या क्वीन्स पार्क ओव्हलवर खेळवली जाईल. कसोटीनंतर दोन्ही संघ तीन सामन्यांची एकदिवसीय आणि पाच सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहेत. २७ जुलैपासून एकदिवसीय मालिकेला आणि ३ ऑगस्टपासून टी२० ला सुरुवात होणार आहे. ट्वीटरवर याची घोषणा करताना, क्रिकेट वेस्ट इंडीज (CWI) म्हणाले, “क्रिकेट वेस्ट इंडीजच्या निवड समितीने १८ सदस्यीय संघ जाहीर केला आहे, जो भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी प्रशिक्षण शिबिरात भाग घेईल.”
वेस्ट इंडिजचा संघ सध्या आयसीसी विश्वचषक पात्रता फेरीत खेळत आहे. त्यामुळे शिबिरासाठी संघात काही वरिष्ठ खेळाडूंची निवड झालेली नाही. या खेळाडूंमध्ये जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ आणि काइल मेयर्स यांच्या नावांचा समावेश आहे. त्याच वेळी, क्वाम हॉज, अॅलिक अथानाझ आणि जैर मॅकअलिस्टर हे विंडीज कॅम्पमधील नवीन चेहरे आहेत. वर्ल्डकप क्वालिफायर खेळणारा वेस्ट इंडिजचा संघ ९ जुलैपर्यंत झिम्बाब्वेमध्ये असेल.
माध्यमातील माहितीनुसार के.एल. राहुल सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. काही आठवड्यांत फलंदाजीचा सराव सुरू करण्यास सज्ज आहे. त्यांची वेस्ट इंडीज दौऱ्यावर कुठल्याही क्रिकेटच्या मालिकेत निवड करण्यात आलेली नाही. राहुल आणि बुमराह सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेतून पुनरागमन करू शकतात. मात्र, याबाबत एन.सी.ए. ने कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
प्रशिक्षण शिबिरासाठी संघ: क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), अॅलिक अथानाझ, जर्मेन ब्लॅकवुड, एनक्रुमाह बोनर, तागेनरीन चंद्रपॉल, रहकीम कॉर्नवॉल, जोशुआ दा सिल्वा, शॅनन गॅब्रिएल, क्वाम हॉज, अकीम जॉर्डन, जैर मॅक अॅलिस्टर, किर्क मॅकेन्झी, मार्की मिनसन, मार्की आणि मार्क्सी फिलीप, रॅमन रेफर, केमार रोच, जेडेन सील्स, जोमेल वॅरिकन.