टी-२० मालिकेत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर, वन-डे मालिकेतही यजमान विंडीज संघाच्या फलंदाजांना सूर सापडत नव्हता. अखेरीस तिसऱ्या वन-डे सामन्यात विंडीजच्या सलामीवीरांनी आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल चढवला. सलामीवीर ख्रिस गेल आणि एविन लुईस यांनी पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी रचली. दोन्ही फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी करत भारतीय गोलंदाजांना पळता भुई थोडी केली.

या भागीदारीदरम्यान विंडीजच्या सलामीवीरांनी तब्बल १७ वर्षांच्या कालावधीनंतर विक्रमाची नोंद केली. विंडीजच्या सलामीवीरांनी ९.१ षटकांमध्येच संघाचं शतक धावफलकावर लावलं. २००२ पासून वन-डे क्रिकेटमध्ये विंडीजच्या संघाला अशी कामगिरी करता आली नव्हती.

ख्रिस गेलने ४१ चेंडूत ७२ धावांची खेळी केली. या खेळीत ख्रिस गेलने ८ चौकार आणि ५ षटकार लगावले. खलिल अहमदने ख्रिस गेलला विराट कोहलीकरवी झेलबाद करत भारताला अपेक्षित यश मिळवून दिलं.

Story img Loader