Kohli-Dravid Special Moments Video: भारतीय संघ बुधवारपासून वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात करणार आहे. उभय संघांमधील पहिला कसोटी सामना डॉमिनिका येथे खेळवला जाणार आहे. १२ वर्षांपूर्वी २०११ मध्ये भारताने येथे शेवटचा कसोटी सामना खेळला होता. ती मालिका विराट कोहलीची पहिली कसोटी मालिका होती. त्याने आतापर्यंत १०० हून अधिक कसोटी सामने खेळले आहेत. २०११ मध्ये खेळल्या गेलेल्या त्या मालिकेत राहुल द्रविड देखील संघाचा एक भाग होता, जो आता मुख्य प्रशिक्षक आहे.
भारतीय वेळेनुसार हा सामना सायंकाळी साडेसात वाजता सुरू होईल. या मैदानावर टीम इंडिया २०११ नंतर प्रथमच कसोटी सामना खेळणार आहे. या मैदानावर टीम इंडियाचा हा दुसरा सामना असणार आहे. २०११ मध्ये भारतीय संघ जेव्हा वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेला तेव्हा राहुल द्रविड त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात होता, दुसरीकडे विराट कोहलीने या कसोटी मालिकेद्वारे कसोटीत पदार्पण केले. आता राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे आणि विराट कोहली संघातील सर्वात वरिष्ठ खेळाडूंपैकी एक.
विराट कोहलीने या मैदानाशी संबंधित एक खास आठवण यापूर्वीच सोशल मीडियावर शेअर केली होती आणि आता बीसीसीआय टीव्हीवर राहुल द्रविड आणि विराट या दोघांनीही त्या कसोटी सामन्याशी संबंधित आठवणी शेअर केल्या आहेत. यादरम्यान राहुल द्रविड असे काही बोलला, त्यानंतर त्याला लगेच यू-टर्न घ्यावा लागला.
राहुल द्रविडने विराट कोहलीची प्रतिभा पाहिली
बीसीसीआयने तो व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये कोहली आणि राहुल द्रविडने १२ वर्षांपूर्वीच्या त्या मालिकेबद्दल बोलले होते. राहुल द्रविड म्हणाला, “विराट कोहली त्यावेळी पहिली कसोटी मालिका खेळत होता. तो एक युवा खेळाडू होता ज्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती आणि तो कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्यात एक विशेष प्रतिभा होती हे आम्ही त्याचवेळी ओळखले होते.”
द्रविड झाला युवा आणि कोहली झाला दिग्गज
राहुल द्रविडने विराटशी संबंधित त्या कसोटीच्या आठवणीबद्दल सांगितले की, “आम्ही जेव्हा येथे गेल्या वेळी खेळायला आलो होतो, तेव्हा विराट खूप तरुण खेळाडू होता. जो एकदिवसीय सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत होता आणि कसोटी संघात नशीब आजमावण्यासाठी आला होता. विराटला स्वतःच्या प्रवासाचा अभिमान असायला हवा. तो आता टीम इंडियाचा अनुभवी आणि वरिष्ठ खेळाडू बनला आहे, मी त्याला अनुभवी म्हणू म्हणायला हवे वरिष्ठ नव्हे.” पुढे द्रविड म्हणाला की, “त्याच्याकडे बघून असे वाटत होते की तो खूप दिवसांपासून इथे असेल. त्याच्या प्रवासाचा मला अभिमान आहे. विराटला युवा खेळाडूतून अनुभवी किंवा वरिष्ठ खेळाडू बनताना पाहून खूप आनंद होत आहे. मला असे वाटते की मी एक तरुण प्रशिक्षक आहे जो नुकताच आपला प्रवास सुरू करत आहे.”
विराट कोहलीला त्याची पहिली कसोटी मालिका आठवली
कोहलीने यावर प्रतिक्रिया दिली, “मला वाटते की तो खूप दिवसांपासून प्रशिक्षक म्हणून काम करत असताना स्वत:ला युवा प्रशिक्षक म्हणवून घेणं याच्यातून तो खूप नम्र आहे, हे दिसते. १२ वर्षांनंतर आपण या ठिकाणी एका वेगळ्या रूपात येऊ, याची मला कल्पनाही नव्हती. मी त्याला एवढेच सांगितले की इतक्या वर्षांनी आपण इथे परत येऊ, तो प्रशिक्षक असेल आणि मी १०० हून अधिक सामने खेळलेला असेल असे मला कधीच वाटले नव्हते.”
सहा वर्षांनंतर विंडसर पार्कवर कसोटी सामना होणार आहे
विंडसर पार्क येथे सहा वर्षांनंतर कसोटी सामना होणार असून या फॉरमॅटमध्ये कॅरेबियन संघाला गेल्या काही वर्षांत चांगला खेळ करता आला आहे. त्यामुळे विश्वचषक पात्रता फेरीचा त्याच्या कसोटीतील कामगिरीवर परिणाम होईल, असा विचार करणे मूर्खपणाचे ठरेल. त्यांच्याकडे रोच (२६१ विकेट्स) आणि गॅब्रिएल (१६४ विकेट्स) सारखे वेगवान गोलंदाज आहेत. गॅब्रिएल पांढऱ्या चेंडूचे क्रिकेट खेळत नाही. अशा स्थितीत कॅरेबियन खेळपट्ट्यांवर अपेक्षेप्रमाणे कामगिरी करणे कर्णधार रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली यांच्यासाठी आव्हानात्मक असेल.