विंडीजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला ४३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. २८४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव २४० धावांत आटोपला. होपच्या शतकामुळे विंडीजने २८३ धावांपर्यंत मजल मारली होती. विराट कोहलीने शतक ठोकूनही भारताला हे आव्हान पेलता आले नाही. या विजयामुळे विंडीजने मालिका १-१ अशी बरोबरीत आणली आणि आपल्या आशा जिवंत ठेवल्या. यानंतर विजयी कर्णधार जेसन होल्डरने या विजयाचे श्रेय सांघिक कामगिरीला दिले.
संघातील प्रत्येक खेळाडू आज उत्तम खेळला. आम्ही अप्रतिम खेळ करून दाखवला. सामन्याचा आणि मालिकेचा विचार करता मला त्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक होते. त्याप्रमाणे मी अभयास केला होता. पण ही सांघिक कामगिरी आहे. आम्ही सामन्यात टिकून राहिलो हे आमच्यासाठी महत्वाचे होते. पण आता आमच्या संघातील खेळाडू शिकत आहेत आणि स्वतःला विकसित करत आहेत. पण अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे, असे तो म्हणाला.
दरम्यान, विंडीजचा संघ आक्रमक आहे. त्यांच्याकडे स्फोटक फलंदाज आहेत. त्यामुळे कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता या संघात आहे आणि म्हणूनच ते जिंकले, अशा शब्दात विराटनेही विंडीजच्या संघाचे कौतुक केले.