भारतीय संघाने विंडिजविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तब्बल ३१८ धावांनी विजय मिळवला. धावांच्या तुलनेत हा भारताचा परदेशातील सर्वात मोठा विजय ठरला. बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा दुसरा डाव केवळ १०० धावांमध्ये आटोपला. जसप्रीत बुमराहने पाच आणि इशांत शर्माने तीन बळी घेत भारताला विजय मिळवून दिला. या मानहानीकारक पराभवानंतर विंडिजच्या संघात एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे.
विंडिजचा मध्यमगती गोलंदाज किमो पॉल याचे १५ खेळाडूंच्या संघात पुनरागनम झाले आहे. पहिल्या सामन्यातून त्याला शेवटच्या क्षणाला माघार घ्यावी लागली होती. त्याच्या जागी मिग्युअल कमिन्स या फिरकीपटूला संघात स्थान देण्यात आले होते. पण कमिन्सला संघात चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याच्या जागी किमो पॉलचे संघात पुनरागमन झाले आहे. भारताविरूद्धच्या पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावात किमो पॉल राखीव खेळाडू म्हणून मैदानावर क्षेत्ररक्षण करताना दिसला होता. त्यावेळीच त्याला पुढील सामन्यासाठी संघात स्थान मिळणार हे निश्चित झाले होते. त्यानुसार विंडिजच्या संघाने त्याला १५ जणांच्या संघात स्थान दिले आहे.
किमो पॉल IPL 2019 मध्ये दिल्लीच्या संघाकडून खेळला होता. त्यावेळी त्याने आठ सामन्यात नऊ बळी टिपले होते. तर त्याच्या जागी पहिल्या कसोटी सामन्यात संघात स्थान मिळालेल्या कमिन्सने मात्र फारशी चांगली कामगिरी केली नाही. कमिन्सने सामन्यात एकूण २० षटके टाकली, पण त्याला एकही बळी टिपता आला नाही. तसेच फलंदाजीतही त्याला काही करता आले नाही. पहिल्या डावात त्याने ४५ चेंडूत शून्य धावा केल्या तर दुसऱ्या डावात २२ चेंडूत १९ धावा केल्या.