India vs West Indies 2nd Test 1st Day: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना त्रिनिदादमध्ये खेळवला जात आहे. भारताकडून पदार्पणाच्या कसोटीत १७१ धावा करणाऱ्या यशस्वी जैस्वालने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ५७ धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर या युवा खेळाडूने ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या विराट कोहलीसोबत फलंदाजी करण्याचा अनुभव सांगितला. या दरम्यान त्याने विराट कोहलीचे कौतुक केले.
२१ वर्षीय यशस्वी जैस्वाल स्वतःला भाग्यवान समजते की, त्याला विराट कोहलीसोबत खेळण्याची संधी मिळाली. जैस्वाल म्हणाला की, कारकिर्दीच्या सुरुवातीला दिग्गज (किंग कोहली) सोबत खेळणे ही मोठी गोष्ट आहे. आयसीसीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये जैस्वाल विराट कोहलीबद्दल बोलताना म्हणाला, “ते एक महान खेळाडू आहेत. त्यांच्यासोबत खेळण्यात मी धन्यता मानतो आणि ते खूप छान आहे. त्याच्याबरोबर बाहेर पडणे आणि त्यांना पाहणे, त्यांच्याकडून शिकणे खूप छान आहे.”
यशस्वी जैस्वाल विराट कोहलीबद्दल म्हणाले की, ‘त्यांना फलंदाजी करताना पाहणे हा एक अद्भुत अनुभव आहे. मी काय बोलावे, तो एक दिग्गज आहे. त्यांच्यासोबत खेळण्यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, मग ते क्रिकेट असो किंवा बाहेरील काही असो. मी त्यांचे मन समजून घेण्याचा प्रयत्न करतो.”
हेही वाचा – IND vs WI 2nd Test: विराट कोहलीने मोडला रिकी पाँटिंग आणि जॅक कॅलिसचा मोठा विक्रम
यशस्वी जैस्वालने फलंदाजीच्या रणनीतीबद्दल सांगितले –
आयपीएल २०२३ मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी अप्रतिम फलंदाजी करणाऱ्या यशस्वी जैस्वालने टीम इंडियासाठी पदार्पणाच्या कसोटीत चांगली कामगिरी केली. त्याच्या फलंदाजीच्या रणनीतीबद्दल तो म्हणाला की, “मी जेव्हा फलंदाजीला जातो, तेव्हा मी किती वेळ फलंदाजी करू शकतो, हे पाहण्याचा प्रयत्न करतो. या मानसिकतेने मी उतरलो आहे.”
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस कसा राहिला –
सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर नाणेफेक हारल्यानंतर भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली. त्यानुसार दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने ८४ षटकानंतर ४ गडी गमावून २८८ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये यशस्वी जैस्वाल ५७, रोहित शर्मा ८०, शुभमन गिल १० आणि अजिंक्य रहाणे ८ धावांवर बाद झाले. त्याचबरोबर विराट कोहली ८७ तर रवींद्र जडेजा ३६ धावांवर नाबाद आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डर, गॅब्रिएल, केमार रोच आणि वॅरिकन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.