Yashasvi Jaiswal, IND vs WI: भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल म्हणाला की, “आतापर्यंतचा प्रवास त्याच्यासाठी मोठा आणि कठीण होता. यासोबतच आपल्या पहिल्या कसोटीतील ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार ही केवळ सुरुवात असून भविष्यात असे अनेक पुरस्कार मिळवू, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. जैस्वालने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत तो कोणत्या स्तराचा खेळाडू आहे हे दाखवून दिले. डावखुऱ्या फलंदाजाने पदार्पणाच्या सामन्यात १७१ धावा केल्या आणि कर्णधार रोहित शर्मासोबत २२९ धावांची भागीदारी केली.
पदार्पणात १५० धावा करणारा यशस्वी जैस्वाल तिसरा भारतीय खेळाडू ठरला. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये सनसनाटी कामगिरी केल्यानंतर त्याला भारतीय संघात संधी मिळाली. भारताने शुक्रवारी वेस्ट इंडिजचा एक डाव आणि १४१ धावांनी पराभव करत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
बीसीसीआयने शनिवारी सोशल मीडियावर एक छोटा व्हिडीओ पोस्ट केला, ज्यामध्ये २१ वर्षीय जैस्वाल ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळवल्यानंतर त्याच्या हॉटेलच्या रूममध्ये परतताना दिसत आहे. आपल्या हॉटेलच्या रुममध्ये पायऱ्या चढून जात असताना जैस्वाल म्हणाला, “पहिल्याच सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळाल्याने खूप छान वाटत आहे. हा खूप लांबचा प्रवास असून अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. आज मी आनंदित असून देवाकडे फक्त एवढीच प्रार्थना करेन की असेच आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे.”
युवा यशस्वी पुढे म्हणाला की, “भविष्यात माझ्याबाबतीत काय होईल ते पुढे पाहूच पण ही माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची फक्त सुरुवात आहे. मी असाच खेळत राहो, अधिक प्रयत्न करत राहो आणि संघासाठी योगदान देत राहो हीच ईश्वराकडे प्रार्थना करतो,” त्यानंतर या तरुण क्रिकेटपटूने ट्रॉफी आपल्या खोलीतील टेबलवर ठेवली आणि यशाबद्दल सर्वांचे आभार मानले. तो पुढे म्हणाला, “शेवटी तुमचे खूप खूप आभार. माझ्यासाठी हा एक संस्मरणीय क्षण आहे. तुमच्या प्रेम आणि समर्थनासाठी धन्यवाद!”
तत्पूर्वी, जैस्वालने ट्रॉफी स्वीकारताना म्हटले होते की, देशासाठी कसोटी खेळणे हा माझ्यासाठी भावनिक क्षण होता आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे सल्ल्याबद्दल आभार मानले. यशस्वी म्हणाला, “आम्ही खूप चांगली तयारी केली. राहुल द्रविड सरांशी बोललो आणि त्यांच्याकडून खूप काही शिकलो. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल सर्व निवडकर्त्यांचे आणि रोहित (शर्मा) सरांचे आभार मानू इच्छितो. हे खरोखर चांगले आहे, मी त्यांनी सांगितलेल्या सूचनांवर काम करत आहे.”
यशस्वी व्हिडीओत बोलताना म्हणाला, “भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळणे खूप खास आणि भावनिक आहे. ही फक्त सुरुवात आहे, मला माझ्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करून काम करत राहण्याची गरज आहे. माझ्या प्रवासात अनेकांनी मला मदत केली आहे आणि मी प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो.”