IND vs ZIM 1st ODI Result: आजपासून (१८ ऑगस्ट) भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला सामना हरारे येथील ‘हरारे स्पोर्ट्स क्लब’ मैदानावर खेळवला गेला. या सामन्यात भारताने यजमान झिम्बाब्वेचा दहा गडी राखून सहज पराभव केला. सलामीवीर शुबमन गिल आणि उपकर्णधार शिखर धवन यांनी १९२ धावांची भागीदारी केली. या विजयामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी मिळवली आहे.

प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने भारतासमोर १९० धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताने ३०.५ षटकांत एकही गडी न गमावता १९२ धावा केल्या. यजमानांनी विजयासाठी दिलेले १९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी शिखर धवन आणि शुबमन गिल सलामीला मैदानात उतरले होते. त्यांनी अजिबात घाई न करता खेळ केला. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना दोघांची जोडी फोडण्यात अपयश आले. शिखर धवनने ११३ चेंडूत नाबाद ८१ आणि शुबमन गिलने ७२ चेंडूत नाबाद ८२ धावा केल्या. या दरम्यान शिखर धवनने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील सहा हजार ५०० धावांचा टप्पा पार केला.

त्यापूर्वी, भारतीय कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेचा संघ ५७ चेंडू शिल्लक असतानाचा सर्वबाद झाला. झिम्बाब्वेने ४०.३ षटकांत १८९ धावा केल्या आहेत. झिम्बाब्वेचा कर्णधार असलेल्या रेगिस चकाब्वाने सर्वाधिक ३५ धावा केल्या. भारताच्यावतीने अक्षर पटेल, दीपक चहर आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. तर, मोहम्मद सिराजने एक गडी बाद केला.

हेही वाचा – मराठमोळे चंद्रकांत पंडित देणार शाहरुखच्या संघाला प्रशिक्षण! आर्यन खानने खास पोस्ट करून केले स्वागत

भारताचा हा झिम्बाब्वेविरुद्धचा सलग १३वा विजय आहे. प्रदीर्घ काळानंतर संघात पुनरागमन करून सात षटकांमध्ये तीन गडी बाद करणाऱ्या दीपक चहरला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. मालिकेतील दुसरा सामना २० ऑगस्ट रोजी हरारे येथे होणार आहे.

Story img Loader