भारत विरुद्ध झिम्बाब्वे तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून (१८ ऑगस्ट) सुरुवात झाली. हरारे येथील ‘हरारे स्पोर्ट्स क्लब’ मैदानावर खेळवला गेलेला पहिला सामना भारताने जिंकला आहे. या सामन्यात भारताने यजमान झिम्बाब्वेचा दहा गडी राखून सहज पराभव केला. सलामीवीर शुबमन गिल आणि उपकर्णधार शिखर धवन यांनी १९२ धावांची भागीदारी केली. या दरम्यान शिखरने सलामीवीर म्हणून सहा हजार ५०० धावांचा टप्पा पार केला.

प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने भारतासमोर १९० धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताने ३०.५ षटकांत एकही गडी न गमावता १९२ धावा केल्या. शिखर धवनने नऊ चौकारांच्या मदतीने ११३ चेंडूत नाबाद ८१ धावा केल्या. हे धवनच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ३८वे अर्धशतक ठरले.

आजच्या सामन्यात अर्धशतक केल्यानंतर शिखर धवन सहा हजार ५०० पेक्षा जास्त धावा करणारा भारताचा सहावा सलामीवीर ठरला आहे. त्याने १५३ सामन्यांमध्ये हा टप्पा गाठला. अशी कामगिरी करून तो सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग आणि सौरव गांगुलीच्या यादीमध्ये जाऊन बसला आहे.

हेही वाचा – IND vs ZIM 1st ODI: भारताचा झिम्बाब्वेवर दहा गडी राखून सहज विजय; शिखर धवन अन् शुबमन गिलची अर्धशतकं

याशिवाय, शिखर धवन २०२०नंतर २३ एकदिवसीय सामने खेळून हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय फलंदाज आहे. याबाबतीत केएल राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १६ सामन्यांत ७४५ धावा केल्या आहेत. तर, तिसऱ्या क्रमांकावर माजी कर्णधार विराट कोहली आहे. कोहलीने १६ सामने खेळून ७३५ धावा केल्या आहेत.

Story img Loader