भारत आणि झिम्बाव्बेदरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना ‘हरारे स्पोर्ट्स क्लब’ क्रिकेट मैदानावर झाला. या सामन्यात भारताने यजमान संघावर पाच गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत भारताला २-० अशी विजयी आघाडी मिळाली आहे.
पहिल्यांदा फलंदाजी करून यजमान संघाने ३८.१ षटकांमध्ये सर्वबाद १६१ धावा केल्या होत्या. झिम्बाब्वेने विजयासाठी दिलेले १६२ धावांचे लक्ष्य भारतीय संघाने पाच गडी गमावून २५.५ षटकांमध्ये पार केले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का कर्णधार केएल राहुलच्या रूपात बसला. तो केवळ एक धाव करून तंबूत परतला. विशेष म्हणेज आजच्या सामन्यात राहुल स्वत: सलामीला आला होता. मात्र, मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्यानंतर शिखर धवन आणि शुबमन गिल यांनी दुसऱ्या गड्यासाठी २९ चेंडूत ४२ धावांची भागीदारी केली.
पहिल्या एकदिवसीय सामन्याप्रमाणे या सामन्यातसुद्धा धवन-गिल जोडी भारतीय डावाचा शेवट करेल असे वाटत असताना धवन ३३ धावा करून धवन बाद झाला. त्यानंतर, ईशान किशन (६), शुबमन गिल (३३) आणि दीपक हुडा (२५) बाद झाले. यष्टीरक्षक संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांनी भारतीय डावाचा शेवट केला. भारताच्यावतीने संजू सॅमसनने सर्वाधिक ४३ धावा केल्या.
त्यापूर्वी, भारतीय कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले होते. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या झिम्बाब्वेची सुरुवात निराशाजनक झाली. संघाचा धावफलक ३१ धावांवर जाऊपर्यंत चार गडी बाद झाले होते. त्यानंतर शॉन विल्यम्सने ४२ धावांची खेळी करून संघाचा डाव काही प्रमाणात सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण, भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे झिम्बाब्वेचा निभाव लागला नाही. संपूर्ण संघ ३८.१ षटकांत गारद झाला.
भारताच्यावतीने दीपक चहरच्या जागी संघात स्थान मिळालेल्या शार्दुल ठाकुरने सर्वाधिक तीन गडी बाद केले. तर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, दीपक हुडा यांनी प्रत्येक एक गडी बाद केला. ३९ चेंडूत ४३ धावा करणाऱ्या संजू सॅमसनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. मालिकेतील तिसार आणि शेवटचा सामना २२ ऑगस्ट रोजी हरारे येथे होणार आहे.