भारतीय क्रिकेट संघ तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेला आहे. आज (२० ऑगस्ट) ‘हरारे स्पोर्ट्स क्लब’ क्रिकेट मैदानावर दोन्ही देशांदरम्यान दुसरा एकदिवसीय सामना होत आहे. या सामन्यातील नाणेफेक होताच भारतीय कर्णधार केएल राहुलला क्रिकेट चाहत्यांच्या रागाचा सामना करावा लागला आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर राहुलला चांगलेच फैलावर घेतले आहे.
झिम्बाब्वेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्याने आजच्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणाही केली. पहिल्या एकदिवसीय सामन्यात तीन बळी घेऊन सामनावीर ठरलेल्या दीपक चहरला दुसऱ्या सामन्यात घेतले नाही. कर्णधार केएल राहुलने नाणेफेकीदरम्यान त्याला संघातून वगळल्याची माहिती दिली. त्याच्या जागी शार्दुल ठाकूरचा संघात समावेश करण्यात आला. राहुल चहरला संघात का घेतले नाही याचे कारण सांगितले नाही. त्यामुळे क्रिकेट आणि दीपकचे चाहते संतप्त झाले आहेत.
पहिल्या सामन्यात सामनावीर ठरलेल्या दीपक चहरला संघात जागा का मिळाली नाही? अशा प्रश्न बहुतेक चाहत्यांनी विचारला आहे. काहींनी संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. काहींनी तर कर्णधार केएल राहुल वेड्यासारखे निर्णय घेत असल्याचेही म्हटले आहे.
चाहतेच नाही तर भारताचे माजी खेळाडू सबा करीम यांनीही चहरला वगळल्याच्या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. ते म्हणाले, “दुखापतीनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या खेळाडूला एकाच सामन्यानंतर खाली बसवले यामागे काहीतरी कारण असेल. पण, चहरच्या जागी शार्दुलला खेळवणे योग्य नाही. शार्दुलऐवजी आशिया चषकात स्थान मिळालेल्या आवेश खानला संधी मिळणे गरजेचे होते.”
दीपक चहरने पहिल्या एकदिवसीय सामन्यात सात षटकांत तीन गडी बाद केले होते. तब्बल सहा महिन्यांनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला आहे.