हरारे येथे भारत विरुद्ध झिम्बाब्वे एकदिवसीय मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. या सामन्यातील दुसऱ्या डावात मांकडिंगचा अनपेक्षित प्रकार घडला. दीपक चहरने झिम्बाब्वेच्या डावातील पहिल्याच चेंडूवर सलामीवीर इनोसंट काईयाला इशारा म्हणून नॉन-स्ट्रायकर बाजूच्या यष्ट्या उडवल्या.

झिम्बाब्वेच्या डावाची सुरुवात झाल्यानंतर कर्णधार केएल राहुलने दीपक चहरकडे चेंडू दिला. दीपक चेंडू फेकण्यासाठी धावत आला. त्याच वेळी सलामीवीर इनोसंट काईया क्रीज सोडून पुढे जात होता. ही गोष्ट दीपकच्या लक्षात येताच त्याने हातातील चेंडू न फेकता नॉन-स्ट्रायकर बाजूच्या यष्ट्या उडवल्या. मात्र, त्याने अपील केले नाही.

जेव्हा गोलंदाज नॉन-स्ट्रायकर बाजूच्या यष्ट्या उडवून फलंदाज बाद करतो, या पद्धतीला ‘मांकडिंग’ म्हटले जाते. क्रिकेटमध्ये अनेकदा अशा प्रकारे फलंदाज बाद झाले आहेत. मात्र, हा प्रकार खेळ भावनेच्या विरोधात असल्याचा वाद सुरू झाला होता. त्यामुळे क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) या वर्षाच्या (२०२२) मार्च महिन्यामध्ये या नियमामध्ये सुधारणा केली. त्यामुळे आज दीपक चहरने यष्ट्या उडवूनही अपील केले नाही.

Story img Loader