भारतीय क्रिकेट सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. आज (२२ ऑगस्ट) दोन्ही देशांदरम्याच्या तीन एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राहुल आणि शिखर धवन यांनी भारतीय डावाची सुरुवात केली. मात्र, शिखर धवन मैदानात उतरताच जोरदार चर्चा सुरू झाली. शिखर धवनने पाठीवर चिकटटेप लावलेली जर्सी घातली होती. जर्सी नंबर बघून धवनने शार्दुल ठाकूरची जर्सी घातल्याचे चाहत्यांच्या लक्षात आले. त्यामुळे चाहत्यांनी शिखर धवन आणि शार्दुल ठाकूरबद्दल मजेशीर मीम्स तयार केले आहेत.
शिखर धवनच्या जर्सीचा क्रमांक ४२ आहे, तर शार्दुलचा जर्सी क्रमांक ५४ आहे. तिसऱ्या सामन्यात धवन शार्दुलची जर्सी घालून मैदानात आला. धवनने असे का केले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, चाहत्यांनी सोशल मीडियावर या प्रकाराबाबत भन्नाट मीम्स शेअर केले आहेत. शिखर धवनला ‘गब्बर’ म्हणून ओळखले जाते. शार्दुलचे आडनाव ‘ठाकूर’ आहे. त्यामुळे चाहत्यांनी शोले चित्रपटातील गब्बर आणि ठाकूरसोबत दोन्ही क्रिकेटपटूंची तुलना करून मीम्स तयार केले.
दरम्यान, प्रत्येक खेळाडूला त्याचा वेगळा जर्सी क्रमांक दिला जातो. सामन्यादरम्यान जर्सी हिच त्या खेळाडूची ओळख असते. मैदानावरील प्रेक्षक खेळाडूंना त्यांच्या जर्सी क्रमांकावरूनच ओळखतात. जेव्हा एखादा खेळाडू दुसऱ्या खेळाडूची जर्सी घालून मैदानात उतरतो तेव्हा प्रत्येकाच्या मनात संभ्रम निर्माण होतो. असे होऊ नये म्हणून जर्सीवर चिकटटेप लावला जातो.
याआधीही अनेकदा भारतीय खेळाडू दुसऱ्या खेळाडूची जर्सी घालून खेळताना दिसले आहेत. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत दीपक हुड्डाने प्रसिद्ध कृष्णाची जर्सी घातली होती. वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेत सूर्यकुमार यादव आणि आवेश खान यांनी अर्शदीप सिंगची जर्सी घातली होती. एका खेळाडूने दुसऱ्या खेळाडूची जर्सी घालण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात.