Abhishek Sharma Hit First T20i Century In His 2nd Match Against Zimbabwe : आपल्या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या अभिषेक शर्माने दुसऱ्या सामन्यात सर्व कसर भरून काढली. त्याने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना धुलाई करत ४६ चेंडूत वादळी शतक झळकावले. त्याचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक आहे. तो भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतक झकावणाऱ्या खेळांडूच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. सलामीला आलेल्या अभिषेक शर्माने अवघ्या ४६ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकार लगावत आपले शतक पूर्ण केले. त्याचबरोबर अभिषेक शर्माने रोहित शर्माचा एक खास विक्रम मोडला.
अभिषेकने झळकावले तिसरे वेगवान शतक –
झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्माने अवघ्या ४६ चेंडूंमध्ये ८ षटकार आणि ७ चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. मात्र, पुढच्याच चेंडूवर तो झेलबाद झाला. या फॉरमॅटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा अभिषेक केएल राहुलसह संयुक्तपणे तिसरा भारतीय ठरला आहे. केएल राहुलनेही ४६ चेंडूत शतक झळकावले. त्याचबरोबर या फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने ३५ चेंडूत हा पराक्रम केला. दुसऱ्या स्थानावर सूर्यकुमार यादव आहे, ज्याने ४५ चेंडूत शतक पूर्ण केले. या काळात अभिषेकचा स्ट्राइक रेट २१२.७७ होता. त्याने ऋतुराज गायकवाडबरोबर दुसऱ्या विकेटसाठी १३७ धावांची शतकी भागीदारी केली.
अभिषेकने मोडला रोहित शर्माचा विक्रम –
झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात अभिषेक शर्माने त्याच्या डावात ८ षटकार ठोकले. ज्यामुळे तो २०२४ मध्ये टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला. यावर्षी टी-२० मध्ये रोहित शर्माने एकूण ४६ षटकार मारले होते, मात्र आता अभिषेकच्या नावावर एकूण ५० षटकार झाले असून तो रोहित शर्माच्या पुढे गेला आहे. विराट कोहलीने २०२४ मध्ये एकूण ४५ षटकार मारले होते. त्याचबरोबर टी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा १०वा भारतीय फलंदाज ठरला आहे.
टी-२० क्रिकेट २०२४ मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज –
अभिषेक शर्मा- ५० षटकार
रोहित शर्मा- ४६ षटकार
विराट कोहली- ४५ षटकार
हेही वाचा – लेक आणि जावयासमोर शाहिद आफ्रिदीचा शानदार खेळ, पाकिस्तानची भारतीय चॅम्पियन्सवर ६८ धावांनी मात
टी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावणारे भारतीय –
- रोहित शर्मा ५
- सूर्यकुमार यादव ४
- के.एल.राहुल २
- विराट कोहली १
- शुबमन गिल १
- दीपक हुड्डा १
- सुरेश रैना १
- यशस्वी जैस्वाल १
- ऋतुराज गायकवाड १
- अभिषेक शर्मा १