India Tour of Zimbabwe: भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. चहल आणि त्याची पत्नी धनश्री एकमेकांपासून वेगळे होणार, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. मात्र, दोघांनी या अफवा असल्याचे स्पष्ट केले. अशातच चहलच्या संघ सहकाऱ्यांनीही त्याची खिल्ली उडवली आहे. भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर दीपक चहर आणि अक्षर पटेल यांनी मिळून युजवेंद्र चहलची खिल्ली उडवली.
भारताने मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेवर १० गडी राखून विजय मिळवला. तब्बल सात महिन्यांनंतर संघात पुनरागमन करणारा दीपक चहर या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने २७ धावा देऊन तीन बळी घेतले. या कामगिरीसाठी त्याला सामनावीरचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यानंतर अक्षर पटेलने बीसीसीआय टीव्हीसाठी दीपकची मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान दोघांनी युजवेंद्र चहलला ट्रोल केले.
साधारणपणे कोणत्याही सामन्यानंतर युझवेंद्र चहल सामनावीर खेळाडूची लहानशी मुलाखत घेत असतो. त्याचा हा मुलाखतीचा कार्यक्रम ‘चहल टीव्ही’ नावाने प्रसिद्ध आहे. पण, सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघात फिरकीपटू चहलचा समावेश नाही. त्यामुळे बीसीसीआयसाठी मुलाखती घेण्याची जबाबदारी अक्षर पटेलला मिळाली.
पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर अक्षर पटेलने सामनावीर दीपक चहरची मुलाखत घेतली. ही संधी साधून दीपक चहरने युजवेंद्र चहलला टोमणा मारला. दीपक अक्षर पटेलला म्हणाला,”मला असं वाटतंय तू कुणाची तरी जागा घेण्याचा निश्चय केला आहे. असं वाटतंय चहल टीव्ही आता अक्षर टीव्ही बनला आहे.” दीपकच्या या वक्तव्यानंतर दोघेही जोरात हसले. बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.