क्रिकेट हा फुटबॉलनंतर जगातील दुसरा लोकप्रिय खेळ मानला जातो आणि भारतीय क्रिकेट संघ लोकप्रिय संघापैकी एक आहे. जगभरात भारतीय क्रिकेट संघाचे चाहते विखुरलेले आहेत. त्यामुळे भारतीय संघ जिथे जातो तिथे त्यांना चाहते भेटण्यासाठी येतात. काही चाहते क्रिकेट बघण्यासाठी इतके उत्सुक असतात की, त्याबदल्यात ते काहीही करण्यास तयार होतात. सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार केएल राहुलचा याचा प्रत्यय आला.

भारतीय क्रिकेट संघ तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वेला गेला आहे. १८ ऑगस्टपासून (गुरुवार) मालिकेला सुरुवात झाली आहे. त्यापूर्वी, बुधवारी भारतीय संघ ‘हरारे स्पोर्ट्स क्लब’ येथे सराव करत होता. त्यावेळी एक किशोरवयीन चाहता त्याठिकाणी आला होता. त्याने कर्णधार केएल राहुल आणि सलामीवीर ईशान किशनसह फोटो काढले. फोटो काढताना राहुलने या मुलासोबत संवाद साधला. या संवादादरम्यान मुलाने शाळेबद्दल काढलेले उद्गार ऐकूण काही क्षणांसाठी केएल राहुलही थक्क झाला होता.

हेही वाचा – चेंडू हेल्मेटमध्ये अडकला तर त्याला कॅच म्हणावे का? १४० पैकी केवळ तीनजणांना आले बीसीसीआयच्या प्रश्नाचे उत्तर

पत्रकार विमल कुमार यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर याचा घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. राहुलने आपल्या चाहत्याला विचारले, “उद्या सामना बघायला येणार का?” त्यावर त्या मुलाने झटकन उत्तर दिले, “येणार ना! शाळा गेली चुलीत”. मुलाचे उत्तर ऐकूण राहुलने त्याला समज दिली. मात्र, उद्या शाळेत महत्त्वाचे काही नाही, असे म्हणून त्या चाहत्याने राहुलला पुन्हा निरुत्तर केले.

दरम्यान, भारतीय संघ सहा वर्षांच्या अंतरानंतर झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला आहे. त्यामुळे स्थानिक चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यापूर्वी, एमएस धोनी कर्णधार असताना भारत झिम्बाब्वेमध्ये गेला होता. त्यावेळी केएल राहुलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणात शतक ठोकणारा तो पहिला आणि एकमेव भारतीय ठरला होता.

Story img Loader