India W vs Australia W 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील शेवटचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. कंगारू संघाने पहिले दोन सामने जिंकून मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. भारतीय महिला संघ विजयासह सलग नऊ सामन्यांची पराभवाची मालिका खंडित करू पाहत आहे. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ३३८ धावा केल्या. वानखेडे स्टेडियमवर हरमन ब्रिगेड या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करून इतिहास रचणार का? हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्ट्रेलियाची कर्णधार अ‍ॅलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचे दोन्ही सलामीवीर फलंदाज फोबी लिचफिल्ड आणि अ‍ॅलिसा यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १८९ धावांची भागीदारी केली. कर्णधार अ‍ॅलिसा हिलीचे शतक हुकले. ८५ चेंडूत ८२ धावा करून ती बाद झाली. हीलीने आपल्या खेळीत चार चौकार आणि तीन षटकार मारले. २९व्या षटकातील पाचव्या चेंडूवर पूजा वस्त्राकरने तिला क्लीन बोल्ड केले. यानंतर आलेली अ‍ॅलिस पेरी फार काही विशेष करू शकली नाही आणि ९ चेंडूत १६ धावा काढून अमजोत कौरची शिकार झाली. ताहलिया मॅकग्रा (० धावा) आणि बेथ मुनी (३ धावा) यांना एकाच षटकात बाद करून श्रेयंका पाटीलने भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले. मात्र, फोबी लिचफिल्डने ऑस्ट्रेलियाची एक बाजू सांभाळून धरली होती. तिने भारतीय संघातील एकाही गोलंदाजाला स्वतःला बाद करण्याची लवकर संधी दिली नाही. तिने शानदार शतक झळकावत संघाला सुस्थितीत नेले.

लिचफिल्ड शतक झळकावून बाद झाली. दीप्ती शर्माने तिची विकेट घेतली. फोबी लिचफिल्डने १२५ चेंडूत ११९ धावांची तुफानी शतकी खेळी केली. त्यानंतर आलेली अ‍ॅनाबेल सदरलँड २३ धावा करून बाद झाली. तळाची फलंदाज अ‍ॅशले गार्डनर ३० धावा करून संघाला ३०० धावांचा टप्पा पार करण्यात मदत केली. अखेरीस, अ‍ॅलेना किंगने १४ चेंडूत २६ धावांची आक्रमक नाबाद खेळी करत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ३३८ पर्यंत नेली. भारतीय संघाकडून श्रेयंका पाटीलने तीन आणि अमनजोत कौरने दोन विकेट्स घेतल्या. पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट घेत संघाला मदत केली.

हेही वाचा: AUS vs PAK 3rd Test: तिसऱ्या कसोटीत पाकिस्तानने घेतला मोठा निर्णय, ‘या’ दोन स्टार खेळाडूंना दाखवला बाहेरचा रास्ता

दोन्ही संघांचे प्लेइंग११

ऑस्ट्रेलिया: फोबी लिचफील्ड, अ‍ॅलिसा हिली (कर्णधार/यष्टीरक्षक), अ‍ॅलिस पेरी, बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, अ‍ॅशले गार्डनर, अ‍ॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरेहम, एलाना किंग, किम गर्थ, मेगन शट.

भारत: यास्तिका भाटिया, स्मृती मानधना, रिचा घोष (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, मन्नत कश्यप, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind w vs aus w australia set a target of 339 runs for india phoebe litchfields excellent century avw