India W vs Australia W ODI and T20 Squad: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. यष्टिरक्षक फलंदाज रिचा घोष आणि वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूर यांचे वन डे संघात पुनरागमन झाले आहे. वानखेडे स्टेडियमवर २८ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान एकदिवसीय सामने खेळवले जातील, तर टी-२० सामने नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर ५ ते ९ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहेत.
या जुलैमध्ये बांगलादेशविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी रिचा घोषची निवड करण्यात आली नव्हती. आता पाच महिन्यांनंतर ती एकदिवसीय संघात परतली आहे. वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकमेव कसोटीत रिचाला तिच्या चमकदार कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर, तीतस साधू आणि दावखुरी फिरकीपटू सायका इशाक यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. अलीकडेच इंग्लंडविरुद्धच्या टी-२० दमदार कामगिरी करणाऱ्या श्रेयंका पाटीलचाही प्रथमच एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे.
बांगलादेशविरुद्धची शेवटची एकदिवसीय मालिका खेळलेल्या आणि सध्याच्या संघात समाविष्ट असलेल्या खेळाडूंमध्ये मेघना सिंग, देविका वैद्य आणि प्रिया पुनिया यांचा समावेश आहे. इंग्लंडविरुद्धच्या मागील मालिकेतील टी-२० आंतरराष्ट्रीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, ज्यामध्ये भारतीय महिला संघाला २-१ अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले होते. हरमनप्रीत कौर अँड कंपनीने कसोटी सामन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया सध्या वन डे आणि टी-२० आंतरराष्ट्रीय विश्वविजेते आहे आणि त्यांना भारतीय भूमीवरही पराभूत करणे सोपे जाणार नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना जिंकत रचला इतिहास
भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदाच कसोटी सामना जिंकत इतिहास रचला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संपन्न झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात टीम इंडियाने कांगारूंचा तब्बल आठ गडी राखून धुव्वा उडवला आहे. याआधी भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १० कसोटी सामने खेळले आहेत, त्यातील ४ सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे तर ६ सामने अनिर्णित ठेवण्यात महिला ब्रिगेडला यश आले आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ५ बाद २३३ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडे ४६ धावांची आघाडी होती. कांगारूंचा संघ चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात २६१ धावांवर सर्वबाद झाला. त्यांना एकूण ७४ धावांची आघाडी मिळाली. त्यामुळे भारताला विजयासाठी ७५ धावांचे लक्ष्य मिळाले. टीम इंडियाने हे लक्ष्य एक विकेट गमावत सहजरित्या पार केले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे आणि टी–२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ
एकदिवसीय संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), रिचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका सिंग.ठाकूर, तीतस साधू, पूजा वस्त्राकर, स्नेह राणा आणि हरलीन देओल.
टी–२० संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), रिचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका सिंग.ठाकूर, तीतस साधू, पूजा वस्त्रकार, कनिका आहुजा, मिन्नू मणी.