India W vs Australia W 1st ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वन डे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर २८३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येने एक गडी गमावून १०० धावा पार केल्या आहेत. अॅलिस पेरी अर्धशतक करून सध्या खेळत आहे. तिने फोबी लिचफिल्डबरोबर शतकी भागीदारी केली आहे. कर्णधार अॅलिसा हिली खाते न उघडताच बाद झाली.
पहिल्या डावात काय घडले?
प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत आठ गडी गमावून २८२ धावा केल्या. भारताकडून जेमिमाह रॉड्रिग्जने सर्वाधिक ८२ धावा केल्या. पूजा वस्त्राकरने नाबाद ६२ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून अॅशले गार्डनर आणि जॉर्जिया वेअरहॅमने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. डार्सी ब्राउन, अॅनाबेल सदरलँड, मेगन शुट आणि अलाना किंग यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. शफाली वर्मा पुन्हा एकदा खराब फटका मारून बाद झाली, एक धाव घेतल्यानंतर तिला डार्सी ब्राउनने क्लीन बोल्ड केले. यानंतर यस्तिका भाटियाने ऋचा घोषबरोबर दुसऱ्या विकेटसाठी २९ धावांची भागीदारी केली. रिचा २० चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने २१ धावा करून बाद झाली. कर्णधार हरमनप्रीत कौर काही विशेष करू शकली नाही आणि नऊ धावा करून पॅव्हेलियन सोडली. यास्तिकचे अर्धशतक हुकले. ६४ चेंडूत ४९ धावा करून ती बाद झाली. दीप्ती शर्माही २१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. अमनजोत कौनने २० आणि स्नेह राणाने एका धावेचे योगदान दिले. जेमिमाह रॉड्रिग्जचे शतक हुकले. त्याने ७७ चेंडूत ८२ धावांची शानदार खेळी खेळली. शेवटी पूजा वस्त्राकरने जलद धावा करत उत्कृष्ट अर्धशतक झळकावून टीम इंडियाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले.
दोन्ही संघांचे प्लेइंग–११
भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), रिचा घोष, सायका इशाक, अमनजोत कौर, रेणुका सिंग ठाकूर, पूजा वस्त्राकर, स्नेह राणा.
ऑस्ट्रेलिया: अॅलिसा हिली (कर्णधार), बेथ मूनी, फोबी लिचफिल्ड, अॅलिस पेरी, अॅशले गार्डनर, ताहिला मॅकग्रा, डार्सी ब्राउन, अलाना किंग, मेगन शट, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम.
सलग दोन कसोटी सामन्यांमधील विजयामुळे उत्साही असलेला भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या वन डे मालिकेत आपला विक्रम सुधारण्यासाठी मैदानात उतरला आहे. भारतीय संघ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. नवी मुंबईतील एकमेव कसोटीत इंग्लंडचा विक्रमी ३४७ धावांनी पराभव केल्यानंतर, वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा कसोटी सामना ८ गडी राखून जिंकला होता.