India W vs Australia W 3rd T20: भारतीय महिला संघाला दुसऱ्या टी-२० मध्ये ऑस्ट्रेलियाकडून नक्कीच पराभव पत्करावा लागला, पण तरीही त्यांना मालिका जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. मंगळवारी खेळवण्यात येणारा तिसरा आणि निर्णायक टी-२० सामना जर भारताने जिंकला तर प्रथमच मायदेशात या फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकण्यात हरमनब्रिगेडला यश येईल. तीन सामन्यांची टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत असून टीम इंडियाला येथे विजय मिळवायचा असेल तर, कर्णधार हरमनप्रीतला तिच्या फलंदाजीत चांगली कामगिरी करावी लागेल. तिचा फॉर्म सध्या चिंतेचे कारण आहे. सर्व फॉरमॅटमध्ये गेल्या १० पैकी ७ डावांमध्ये तिला दुहेरी आकडा देखील गाठता आलेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कसोटी हरल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पलटवार केला

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच टी-२० मालिका झाल्या आहेत, ज्यामध्ये भारताने २०१५-१६ मध्ये ऑस्ट्रेलियात एक मालिका जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाने चार मालिका जिंकल्या आहेत. भारताने एकमेव कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून चांगली सुरुवात केली होती, मात्र एकदिवसीय सामन्यात अ‍ॅलिसा हिलीच्या संघाने भारतीय संघाचा ०-३ असा धुव्वा उडवला. पहिल्या टी-२० मध्ये शफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर नऊ विकेट्स राखून मोठा विजय मिळवला, मात्र दुसऱ्या टी-२०मध्ये अ‍ॅलिस पेरी आणि किम गर्थ यांनी ऑस्ट्रेलियाचा ३००वा सामना खेळून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

दीप्तीची दुसऱ्या टी२० मध्ये अष्टपैलू कामगिरी

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या दीप्ती शर्माने दुसऱ्या टी-२०मध्ये अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले. तिने पहिल्या २७ चेंडूत ३१ धावा करत भारताला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेले. त्यानंतर तिने ऑस्ट्रेलियाचे दोन विकेट्स घेत सामना रंजक बनवला. हरमनप्रीतच्या फॉर्मबाबत ती रविवारच्या सामन्यानंतर म्हणाली की, “खेळाडूचा दिवस नेहमीच चांगला असू शकत नाही आणि अचानक कोणाचाही फॉर्म हा जाऊ शकतो.” ती पुढे म्हणाला की, “आम्ही मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत नसून आमच्या गुणवत्तेनुसार चेंडू खेळण्याचा प्रयत्न करत आहोत. चेंडू खेळपट्टीवर फिरकी घेत होता आणि हळू येत होता. आम्ही जवळपास १५ ते २० जास्त करण्यात अपयशी ठरलो.”

हेही वाचा: IND vs AFG: आकाश चोप्राने केले मोठे विधान; म्हणाला, “टी-२० वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा कर्णधार…”

वरिष्ठ खेळाडूंना जबाबदारी घ्यावी लागेल

डी.वाय. पाटील मैदानावरील खेळपट्टी फलंदाजांसाठी आव्हानात्मक असेल. चांगली सुरुवात करण्याची जबाबदारी सलामीवीर आणि आघाडीच्या फळीतील फलंदाजांवर असेल. विशेषत: स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष आणि हरमनप्रीत कौर यांच्या खांद्यावर फलंदाजीची जबाबदारी असणार आहे. यापैकी एकाला निश्चितच मोठी खेळी खेळावी लागेल.

पॅरी फॉर्ममध्ये परतली

विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियासाठी आनंदाची बातमी म्हणजे धोकादायक अ‍ॅलिस पेरी पुन्हा फॉर्ममध्ये आली आहे. दुसऱ्या टी-२०मध्ये तिने संघासाठी उपयुक्त खेळी खेळली. डेप्थ फलंदाजी ही या संघाची भक्कम बाजू आहे. अगदी खालच्या फळीतील फलंदाजांना सुरुवातीचे फलंदाज बाद झाल्यावर देखील डाव हाताळण्याची ताकद आहे. भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारे फोबी लिचफिल्ड, बेथ मुनी, मॅकग्रा, अ‍ॅलिसा हीली हे सर्वच मोठे डाव खेळण्यास सक्षम आहेत.

हेही वाचा: IND vs ENG: “निवडकर्त्यांना जे वाटते त्याचा परिणाम…” मोहम्मद कैफने चेतेश्वर पुजाराबाबत केले सूचक विधान

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे

भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स (यष्टीरक्षक), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया, रिचा घोष, अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, साइका इशाक, रेणुका सिंग ठाकूर, तीतस साधू, पूजा वस्त्राकर, कनिका आहुजा आणि मीनू मणी.

ऑस्ट्रेलिया: डार्सी ब्राउन, हेदर ग्रॅहम, अ‍ॅशले गार्डनर, किम गर्थ, ग्रेस हॅरिस, अ‍ॅलिसा हिली (कर्णधार/यष्टीरक्षक), जेस जोनासेन, अ‍ॅलेना किंग, फोबी लिचफिल्ड, ताहलिया मॅकग्रा, बेथ मूनी, अ‍ॅलिस पेरी, मेगन शट, अ‍ॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind w vs aus w last match of australias tour of india today if team india wins t20 series will be named for the first time avw