Australia Women’s National Cricket Team vs India Women’s National Cricket Team Match Scorecard: भारत वि ऑस्ट्रेलियाचा टी-२० विश्वचषकातील महत्त्वाचा सामना खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १५२ धावा केल्या आहेत. भारताला जर उपांत्य फेरीत जायचे असेल तर भारताला हा सामना जिंकणं खूप महत्त्वाचं असणार आहे. भारताने सामन्याला चांगली सुरूवात करून दिली. रेणुका सिंगने उत्कृष्ट गोलंदाजी करत सलग दोन चेंडूवर दोन विकेट घेतले. ज्यात राधा यादवने उत्कृष्ट झेल टिपत भारताला महत्त्वाची विकेट मिळवून दिली.
भारताने जेव्हा नाणेफेक जिंकली तेव्हा संघात फक्त एक बदल केला होता की आशा शोभनाच्या जागी पूजा वस्त्राकरला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. आशा शोभना प्लेइंग इलेव्हनचा भाग होती परंतु भारताने गोलंदाजी सुरू करण्यापूर्वी सुमारे १० मिनिटे सराव करताना तिच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे भारताला एक बदल करावा लागला आणि डावखुरी फिरकीपटू राधा यादवचा समावेश करण्यात आला. आशाची दुखापत भारतासाठी डोकेदुखी होती पण राधाच्या येण्याने त्याचा नक्कीच मोठा फायदा झाला, कारण संघाचे क्षेत्ररक्षण मजबूत झाले आणि त्याचा परिणामही दिसला.
राधा यादवचा उत्कृष्ट झेल
ऑस्ट्रेलियाची स्टार सलामीवीर बेथ मूनीने ऑस्ट्रेलियाच्या डावातील तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर, म्हणजे सामन्याच्या १६व्या चेंडूवर कट शॉट खेळला, परंतु बॅकवर्ड पॉईंटवर उभ्या असलेल्या राधाने पुढे डायव्हिंग करत एक उत्कृष्ट झेल घेतला. राधाने केलेल्या या जबरदस्त क्षेत्ररक्षणाने या सामन्यात टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. या सामन्यापूर्वी, मुनीने स्पर्धेत ४० आणि ४३ धावांच्या दोन दमदार खेळी खेळून संघाला विजय मिळवून दिला होता. अशा स्थितीत मुनीची विकेट लवकर घेणं टीम इंडियासाठी महत्त्वाचे होतं आणि ते शक्य करण्यात राधाचा मोठा वाटा होता. मुनीला केवळ २ धावा करता आल्या.
टीम इंडियाला या विकेटचा दुहेरी फायदा झाला. कारण रेणुका सिंगने पुढच्याच चेंडूवर जॉर्जिया वेरहॅमला खाते न उघडताच माघारी पाठवले. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने केवळ १७ धावांत २ विकेट गमावल्या. यानंतर राधानेही आपल्या गोलंदाजीची जादू दाखवत टीम इंडियासाठी धोकादायक ठरणारी ऑस्ट्रेलियन कर्णधार ताहलिया मॅकग्राला बाद केले.