India W vs Australia W 1st Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यात एकमेव कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रिचा घोषचे शानदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले, तिने खेळात जागरूकता दाखवत बेथ मुनीला धावबाद केले. भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यातील कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाची पहिली विकेट रिचा घोषने घेतली. रिचाच्या अफलातून थ्रोवर बेथ मूनी धावबाद झाली. मुनीने फोबीबरोबर ४९ धावांची भागीदारी केली होती, दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होते पण नंतर रिचा घोषच्या खेळाच्या सजगतेमुळे भारताला पहिले यश मिळाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१२व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर, बेथ मुनी पुढे आली आणि तिने बचावात्मक फटका खेळला, यष्टिरक्षकासह गोलंदाज आणि इतर भारतीय खेळाडूंनी एलबीडब्ल्यूचे अपील केले परंतु शॉर्ट लेगवर उभ्या असलेल्या रिचा घोषचे लक्ष फक्त क्रिजच्या पुढे आलेल्या फलंदाजावर होते. रिचाने वेळ न दवडता चेंडू थेट स्टंपवर फेकला आणि बेल्स उडाल्या. अशा प्रकारे भारताला पहिले यश मिळाले.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये एकमेव कसोटी खेळली जात आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघाला २१९ धावांत गुंडाळल्यानंतर भारतीय संघाने पहिल्या डावात ४०६ धावा केल्या. अशा प्रकारे टीम इंडियाला पहिल्या डावात १८७ धावांची आघाडी मिळाली. सध्या ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरू आहे. ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का ५६ धावांवर बसला. यानंतर अ‍ॅलिस पेरी आणि ताहिला मॅकग्रा यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी स्नेह राणाने तोडली. तिने पेरीला यस्तिका भाटियाकरवी झेलबाद केले. पेरी ९१ चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने ४५ धावा करून बाद झाला.

ऑस्ट्रेलियाने १५ मिनिटांतच दोन विकेट्स गमावल्या

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात दमदार सुरुवात केली. ११ षटकांत संघाने एकही विकेट न गमावता ४३ धावा केल्या होत्या. १२व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर बेथ मुनी धावबाद झाली. मुनीने स्नेह राणाचा चेंडू रोखला आणि नंतर तो क्रीजच्या बाहेर गेला. दरम्यान, वेळ पाहून रिचाने स्टंपवर फेकले. मुनीने लगेच क्रीजवर परतण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मुनी ३७ चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने ३३ धावा करून बाद झाला. यानंतर स्नेह राणाने १४व्या षटकातील पाचव्या चेंडूवर फोबी लिचफिल्डला त्रिफळाचीत केले. तिला ४४ चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने १८ धावा करता आल्या.

हेही वाचा: Usman Khawaja: ICCने विरोध करूनही उस्मान ख्वाजा काळी पट्टी बांधण्यावर ठाम; म्हणाला, “शोक व्यक्त…”

तिसऱ्या दिवशी भारताचा डाव संपला

भारताने सात विकेट्सवर ३७६ धावांवरून तिसऱ्या दिवसाची सुरुवात केली आणि ३० धावांची भर घालत उर्वरिततीन विकेट्स गमावल्या. शनिवारी पूजा वस्त्राकरच्या रूपाने भारताला पहिला धक्का बसला. दिवसाच्या चौथ्या षटकात सदरलँडने पूजाला किम गर्थकरवी झेलबाद केले. तिचे अर्धशतक हुकले. पूजा १२६ चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने ४७ धावा करून बाद झाली. तिने दीप्तीबरोबर आठव्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी केली.

यानंतर दीप्तीचे पहिले कसोटी शतक हुकले. १७१ चेंडूंत नऊ चौकारांच्या मदतीने ७८ धावा करून ती बाद झाली. तिला किम गर्थने बाद केले. यानंतर रेणुका सिंग गार्डनरच्या हाती सदरलँडकरवी झेलबाद झाली आणि भारताचा डाव ४०६ धावांवर संपला. रेणुकाने आठ धावा केल्या. गार्डनरने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्याचवेळी गार्थ आणि सदरलँडने प्रत्येकी दोन गडी बाद केले. जेस जोनासेनला एक विकेट मिळाली.

हेही वाचा: IND vs SA: पुजारा-रहाणे नाही, ऋतुराजही दुखापतग्रस्त; पहिल्या कसोटीत टीम इंडियात ‘या’ युवा खेळाडूला मिळणार संधी

भारताचा पहिला डाव

शफाली वर्मा ४० धावा करून बाद झाली तर, स्मृती मानधना ७४ धावा करून बाद झाल्या. त्यानंतर आलेल्या स्नेह राणाला फक्त नऊ धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून अ‍ॅशले गार्डनर आणि जेस जोनासेन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. यानंतर रिचा घोष आणि जेमिमाह यांनी चौथ्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी किम गर्थने मोडली. त्याने रिचाला बाद केले. रिचा १०४ चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने ५२ धावा करून बाद झाली. त्याचवेळी जेमिमानेही आपले अर्धशतक पूर्ण केले. कर्णधार हरमनप्रीत कौर खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतली, तर यास्तिका भाटियाला केवळ एक धाव करता आली. यानंतर जेमिमाह रॉड्रिग्स १२१ चेंडूंत नऊ चौकारांच्या मदतीने ७३ धावा करून बाद झाली. तिला अ‍ॅशले गार्डनरने सदरलँडच्या हातून झेलबाद केले. यानंतर दीप्ती आणि पूजाने दुसऱ्या दिवशी एकही विकेट पडू दिली नाही. दुसऱ्या दिवशी दीप्ती ७० आणि पूजा ३३ धावा करून नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतल्या.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २१९ धावांवर आटोपला. बेथ मूनीने ४०, ताहिला मॅकग्राने ५० आणि कर्णधार अ‍ॅलिसा हिलीने ३८ धावा केल्या. याशिवाय किम गर्थने २८ धावा करून नाबाद राहिली. सदरलँड १६ धावा केल्यानंतर, गार्डनर ११ धावा केल्यानंतर, जोनासेन १९ धावा केल्यानंतर, लॉरेन चीटल सहा धावा केल्यानंतर आणि अलाना किंग पाच धावा केल्यानंतर बाद झाले. फोबी लिचफिल्डला खातेही उघडता आले नाही, तर अ‍ॅलिसा पेरी चार धावा करून बाद झाली. भारताकडून पूजा वस्त्राकरने चार विकेट्स घेतल्या. स्नेह राणाने तीन आणि दीप्ती शर्माने दोन गडी बाद करत पूजाला मदत केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind w vs aus w richa ghoshs brilliant fielding beth mooney run out watch the video avw