IND W vs BAN W U19 T20 World cup 2025 : आयसीसी महिला अंडर-१९ विश्वचषकात आज सुपर सिक्समध्ये भारताचा सामना बांगलादेशशी झाला. टीम इंडियाने बांगलादेशवर ८ गडी राखून सहज विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ६४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ७.१ षटकांत २ गडी गमावून विजयावर शिक्कामोर्तब केला. जी त्रिशाने ३१ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने ४० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आणि भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. गोलंदाज वैष्णवी शर्मानेही शानदार गोलंदाजी करत ३ विकेट्स घेतल्या.
भारतीय महिला अंडर-१९ संघाची कर्णधार निक्की प्रसादने नाणेफेक जिंकून बांगलादेशविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाचा हा निर्णय योग्य ठरला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने निर्धारित २० षटकात ८ विकेट्स गमावत केवळ ६४ धावा केल्या. संघाला १०० धावांचा टप्पाही पार करता आला नाही.
बांगलादेशकडून कर्णधार सुमैया अक्तरने सर्वाधिक २१ धावा केल्या. ती नाबाद राहून पॅव्हेलियनमध्ये परतली. सुमैया आणि जन्नतुल मौया यांच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला दोन अंकी धावसंख्या गाठता आली नाही. भारताकडून वैष्णवी शर्माने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय शबनम शकील, जोशिथा आणि जी त्रिशा यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.
टीम इंडियाने ७.१ षटकात लक्ष्याचा पाठलाग केला –
६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने फारसा उशीर केला नाही. त्यांनी हे लक्ष्य केवळ ७.१ षटकांत म्हणजे ३७ चेंडूत ८ विकेट्स राखून पूर्ण केले. जी त्रिशा आणि जी कमलानी यांच्या रूपाने टीम इंडियाच्या केवळ २ विकेट्स पडल्या. त्रिशाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली. त्याने एकट्याने ४० धावा केल्या. याशिवाय कर्णधार सानिका चाळकेने नाबाद ११ आणि कर्णधार निक्की प्रसादने नाबाद ५ धावा केल्या. बांगलादेशकडून अनिसा अक्तार सोबा आणि हबीबा इस्लामने प्रत्येकी १ विकेट्स घेतली. टीम इंडियाची पहिली विकेट २३ आणि दुसरी ६१ धावांवर पडली.