India vs Bangladesh T20 2023: भारत आणि बांगलादेशच्या महिला संघांमधील तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे खेळला गेला. टीम इंडियाने पहिला टी२० सात विकेट्सने जिंकला होता. आता हा सामना जिंकून भारतीय संघाने मालिकेत २-० अशी अजेय आघाडी घेतली आहे. अटीतटीच्या सामन्यात हरमनब्रिगेडने आठ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. दीप्ती शर्मा आणि शफाली वर्मा या फिरकी जोडगोळीने शानदार गोलंदाजी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. शफाली वर्माला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
ढाका येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी२० मध्ये भारताने बांगलादेशचा अवघ्या आठ धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या T20I मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत आठ गडी गमावून केवळ ९५ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ २० षटकांत ८७ धावांवर गारद झाला. मालिकेतील तिसरा सामना १३ जुलै रोजी होणार आहे.
भारताचा डाव
भारताने बांगलादेशसमोर २० षटकांत ९६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताची फलंदाजी फसली. स्मृती मंधाना १३ धावा, शफाली वर्मा १९ धावा आणि जेमिमाह रॉड्रिग्स २१ चेंडूत ८ धावा करून बाद झाली. कर्णधार हरमनप्रीत कौरला खातेही उघडता आले नाही. यस्तिका भाटिया ११, हरलीन देओल ६, दीप्ती शर्मा १० आणि अमनजोत कौर १४ धावांवर बाद झाली. पूजा वस्त्राकर ७ आणि मिन्नू मणीने ५ धावा करून नाबाद राहिल्या. सुलताना खातूनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याचवेळी फहिमा खातूनने २ विकेट्स घेतल्या. मारुफा अख्तर, नाहिदा अख्तर आणि राबेया खान यांना प्रत्येकी एक विकेट घेत त्यांना साथ दिली.
बांगलादेशचा डाव
प्रत्युत्तरात बांगलादेशची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शमीमा सुलताना आणि शथी राणी प्रत्येकी ५ धावा करून बाद झाल्या. मुर्शिदा खातून ४ धावा करून बाद झाली, दुसरीकडे रितू मोनीही ४ धावा करून बाद झाली. यानंतर शोर्ना अख्तर आणि कर्णधार निगार सुलताना यांनी पाचव्या विकेटसाठी ३४ धावांची भागीदारी केली पण ती अयशस्वी ठरली. शोर्णाने ७ धावा करून बाद झाली. पाठोपाठ यानंतर कर्णधार निगार सुलतानाही ५५ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने ३८ धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतली. ती तिच्या संघाकडून सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती. बांगलादेशला शेवटच्या षटकात १० धावांची गरज होती. अष्टपैलू शफाली वर्मा गोलंदाजी करत होती. या षटकात एकूण ४ विकेट्स पडल्या. यातील शफालीने तीन, तर एक खेळाडू धावबाद झाला. शफालीने शेवटच्या षटकात नाहिदा अख्तर (६), फहिमा खातून (०) आणि मारुफा अख्तर (०) यांना बाद केले. त्याचवेळी राबेया खान (०) धावबाद झाली. भारताकडून दीप्ती शर्मा आणि शफाली यांनी सर्वाधिक ३-३ विकेट्स घेतल्या. त्यांना मिन्नू मणीने २ आणि बरेड्डी अनुषालाने एक विकेट घेत सामना जिंकवून देण्यात मदत केली.