IndiaW vs EnglandW T20 World Cup Match Today, 18 February 2023: दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिला टी२० विश्वचषक स्पर्धेत शनिवारी (१८ फेब्रुवारी) भारताचा सामना इंग्लंडशी होत आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना १५१ धावा करत भारतासमोर १५२ धावांचे आव्हान ठेवले आहे. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत रेणुका सिंग ठाकूरने पाच विकेट्स घेत जबरदस्त गोलंदाजी केली.
रेणुका सिंह ठाकूरने भारतासाठी अत्यंत जबरदस्त गोलंदाजी करत चार षटकात १५ धावा देत पाच विकेट्स घेतले. इंग्लंडकडून अनुभवी फलंदाज नताली स्कायव्हरने सर्वाधिक ५० धावा केल्या. यष्टिरक्षक फलंदाज अॅमी जोन्सने २७ चेंडूत ४० धावांची दमदार खेळी केली. कर्णधार हीदर नाइटने २३ चेंडूत २८ धावा केल्या. सोफी एक्लेस्टोन आठ चेंडूत ११ धावा करून नाबाद राहिली. डॅनियल यट आणि कॅथरीन स्क्रिव्हर यांना खातेही उघडता आले नाही. अॅलिस कॅप्सीने तीन धावा केल्या. भारताकडून रेणुका व्यतिरिक्त शिखा पांडे आणि दीप्ती शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश मिळाले.
टीम इंडियाची नजर या स्पर्धेत सलग तिसऱ्या विजयावर आहे. हरमनप्रीतच्या संघाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा तर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला. भारत दोन सामन्यांत चार गुणांसह गटात दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडनेही दोन सामन्यांत दोन सामने जिंकले आहेत. चांगल्या रनरेटमुळे ते पहिल्या स्थानावर आहे. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या इंग्लंडविरुद्ध विजय मिळवल्यास भारताची उपांत्य फेरीसाठी दावेदारी अधिक भक्कम होईल.
इंग्लंडविरुद्ध भारताच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागेल. भारताच्या १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघाची कर्णधार शफाली वर्माला चांगल्या सुरुवातीचे रूपांतर मोठय़ा धावसंख्येत करता आलेले नाही. दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या स्मृती मंधानाने खेळपट्टीवर वेळ घालवणे गरजेचे आहे. जेमिमाह रॉड्रिग्जला कामगिरीत सातत्य राखावे लागेल. तर कर्णधार हरमनप्रीत कौरलाही लवकरच लय मिळवावी लागेल.
आजच्या सामन्यातील दोन्ही संघाची प्लेईंग ११
इंग्लंड: सोफिया डंकले, डॅनिएल येट, एलिस कॅप्सी, नताली सायव्हर, हेदर नाइट (कर्णधार), एमी जोन्स (यष्टीरक्षक), कॅथरीन सायव्हर, सोफी एक्लेस्टोन, शार्लोट डीन, सारा ग्लेन, लॉरेन बेल.
भारत: शफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), शिखा पांडे, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर सिंग.