NZ W beat IND W by 58 runs : महिला टी-२० विश्वचषक २०२४च्या चौथ्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंडचा महिला संघ आमनेसामने आले होते. दोन्ही संघांचा हा स्पर्धेतील पहिला सामना होता. ज्यामध्ये न्यूझीलंडने भारताचा ५८ धावांनी पराभव केला. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ४ गडी गमावून १६० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा संघ १०२ धावांवर गारद झाला. भारतीय महिला संघाकडून चाहत्यांना या सामन्यात मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र त्यांची पूर्ण निराशा झाली. आता उपांत्य फेरीच्या शर्यतीत टीम इंडियाला हा पराभव जड जाऊ शकतो.
भारतीय संघ १०२ धावांवर झाला गारद –
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सोफी डिव्हाईनच्या अर्धशतकाच्या जोरावर किवींनी २० षटकांत चार गडी गमावून १६० धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ १९ षटकांत १० गडी गमावून १०२ धावाच करू शकला. आता भारताचा ६ ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होणार आहे.
किवींनी टाकलेल्या जाळ्यात अडकला भारतीय संघ –
या सामन्यात भारताची सुरुवात खास नव्हती. कार्सनने दुसऱ्याच षटकात शफाली वर्माला बाद केले. तिला केवळ दोन धावा करता आल्या. किवी गोलंदाजाने स्मृती मंधानालाही बाद केले. उपकर्णधारला केवळ १२ धावा करता आल्या. या सामन्यात भारताची फलंदाजी पत्त्याच्या घरासारखी कोसळली. हरमनप्रीत १५, जेमिमा १३, रिचा १२, दीप्ती १३, अरुंधती एक, पूजा आठ, श्रेयंका सात, रेणुका सिंग शून्य आणि आशा शोभना सहा धावा करू शकल्या. न्यूझीलंडकडून रोझमेरी मायरने चार, ली ताहुहूने तीन, एडन कार्सनने दोन आणि अमेलियाने एक विकेट घेतली.
हेही वाचा – ‘त्याने आयराच्या पासपोर्टवर…’, मोहम्मद शमीने मुलीबरोबरचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर हसीन जहाँचा गंभीर आरोप
सोफी डिव्हाईनने झळकावले नाबाद अर्धशतक –
सुझी बेट्स आणि जॉर्जिया प्लिमर यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघींमध्ये पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी झाली, जी अरुंधती रेड्डीने मोडली. तिने बेट्सला श्रेयंका पाटीलकरवी झेलबाद केले. तिने दोन चौकारांच्या मदतीने २७ धावा काढल्या. त्याचवेळी जॉर्जियाने तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३४ धावा केल्या. यानंतर अमेलिया केर आणि सोफी डिव्हाईन यांनी पदभार स्वीकारला. दोघींमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ३२ धावांची भागीदारी झाली.
हेही वाचा – ‘…म्हणून धोनीपेक्षा रोहितची नेतृत्त्व शैली आवडते’, हरभजन सिंगने सांगितले कारण
रेणुका सिंगने १५ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर केरला बाद केले. केवळ १३ धावा करून ती परतली. यानंतर ब्रूक हॅलिडेने कर्णधाराला साथ दिली. दोघींमध्ये ४६ धावांची भागीदारी झाली, जी रेणुकाने १९व्या षटकात मोडली. ब्रूक १६ धावा करून बाद झाली. तर, सोफी डिव्हाईन ५७ धावा करून नाबाद राहिली आणि मॅडी ग्रीन पाच धावा करून नाबाद राहिली. भारतातर्फे रेणुकाने दोन, अरुंधती आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.