IND vs NZ U-19 Women’s T20 World Cup Semifinal: महिला अंडर-१९ टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव केला आहे. यासह टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने भारतासमोर १०८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारतीय संघाने दोन गडी गमावून हे साध्य केले आणि अंतिम फेरीत धडक मारली. पार्शवी चोप्राला सामनाविराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
न्यूझीलंडने ठेवलेल्या १०८ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताने आठ गडी राखून पराभव करत अंडर-१९ महिला टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. येथे भारताचा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील विजेत्याशी होईल. भारताकडून पार्श्वी चोप्राने सर्वाधिक तीन बळी घेतले. त्याचवेळी उपकर्णधार श्वेता सेहरावतने नाबाद ६१ धावा केल्या. सौम्या तिवारीने २२ धावा करत तिला साथ दिली.
तत्पूर्वी, भारताची कर्णधार शफाली वर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय महिला गोलंदाजांनी तो सार्थ ठरवत २० षटकात १०७ धावांत रोखले. जॉर्जिया प्लिमर ३५ (३२), इसाबेला गझ २६(२२) आणि कर्णधार इझी शार्प १३ (१४) या तिघांनाच केवळ दोन आकडी धावसंख्या गाठता आली. भारताकडून पार्शवी चोप्राने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तीतस साधू, मन्नत कश्यप, अर्चना देवी आणि शफाली वर्मा यांनी प्रत्येकी १ गडी बाद करत न्यूझीलंडला कमी धावसंख्येवर रोखले.
अंडर-१९ विश्वचषकातील दुसरा उपांत्य फेरीचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड या दोन तुल्यबळ संघात होणार आहे. त्यादोघांपैकी जो विजयी होईल तो अंतिम भारतीय संघाशी दोन हात करेल. अंतिम फेरीची लढत २९ जानेवारी रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५.१५ मिनिटांनी होणार आहे. याचे थेट प्रेक्षपण स्टार स्पोर्ट्स या वाहिनीवर दाखविण्यात येईल.