आज भारताचा स्वातंत्र्य दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात आहे. सकाळपासून सर्वत्र विविध कार्यक्रमांचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. भारतीयांना अभिमान वाटावा असा हा दिवस प्रत्येक भारतीय आपल्या तिरंग्याला वंदन करून साजरा करत आहे. आजी माजी क्रीडापटूदेखील या दिनी भारतीयांना शुभेच्छा देत आहेत. नेहमी आपल्या हटके ट्विट साठी प्रसिद्ध असलेला भारताचा माजी क्रिकेटपटू सेहवाग याने आजदेखील एक खास फोटो शेअर करून भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

सेहवागने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक अप्रतिम कविता ट्विट केली आहे. या कवितेत भारतमातेचे आणि तिरंग्यांचे गुणगान गायले आहे. पण या कवितेपेक्षादेखील अधिक लक्ष वेधून घेणारा आहे सेहवागने ट्विट केलेला फोटो. सामान्यतः अनेकांनी आपला कोणत्याही कार्यक्रमातील किंवा जुन्या आठवणींचा फोटो शेअर केला असल्याचे दिसते. पण सेहवागने मात्र येथेही ‘हटके’ असा फोटो पोस्ट केला आहे.

 

हा फोटोमध्ये पाच छोटी मुले तिरंग्याला सलाम करताना दिसत आहेत. अत्यंत साधे राहणीमान असलेल्या कुटुंबातील ही मुले आपल्या परीने झेंडावंदनाचा छोटासा कार्यक्रम करत आहेत. एका काठीला एक आयताकृती कागद गुंडाळला असून त्यावर झेंड्याचे चित्र काढलेले आहे. अंडी ती पाच मुले त्या भोवती उभी राहून झेंडावंदन करताना दिसत आहेत. सेहवागने पोस्ट केलेल्या या फोटोला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.