India A win Emerging Women’s Asia Cup 2023: हाँगकाँगमध्ये खेळल्या गेलेल्या इमर्जिंग महिला आशिया कप 2023 भारतीय अ महिला संघाने जिंकला आहे. अंतिम सामन्यात भारतीय अ महिला संघाने बांगलादेशचा ३१ धावांनी धुव्वा उडवला. विजेतेपदाच्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम खेळताना २० षटकांत ७ गडी गमावून १२७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संपूर्ण संघ ९६ धावांत गारद झाला. भारतीय महिला संघाकडून श्रेयंका पाटीलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

भारतीय महिला अ संघाने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. संघाकडून डावाची सुरुवात करणाऱ्या श्वेता सेहरावत आणि उमा छेत्री यांनी पहिल्या विकेटसाठी २८ धावांची भागीदारी केली. यानंतर वृंदा दिनेशने ३६ तर कनिका आहुजाने ३० धावा केल्या. यामुळे भारतीय महिला अ संघाला २० षटकांत ७ गडी गमावून १२७ धावांपर्यंत मजल मारता आली. बांगलादेश महिला अ संघाकडून गोलंदाजीत नाहिदा अख्तर आणि सुलताना खातून यांनी २-२ विकेट घेतल्या.

९६ धावांवर बांगलादेशचा संघ झाला गारद –

१२८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या बांगलादेश अ महिला संघाने सुरुवातीपासूनच विकेट्स गमावल्या. ५१ धावसंख्येपर्यंत निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. या सामन्यात बांगलादेश अ महिला संघ १९.२ षटकांत ९६ धावांवर गारद झाला. संघातील केवळ तीनच फलंदाजांना दुहेरी आकडा पार करता आला.

हेही वाचा – Team India: ‘…म्हणून एमएस धोनीला भारतीय संघाचा कर्णधार नियुक्त केले होते’; माजी भारतीय निवडकर्त्याचा खुलासा

भारताकडून श्रेयंका पाटीलची शानदार गोलंदाजी –

फिरकी गोलंदाज श्रेयंका पाटीलकडून पुन्हा एकदा भारतीय संघासाठी दमदार गोलंदाजी पाहायला मिळाली. श्रेयंका पाटीलने चार षटकांत केवळ १३ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. याशिवाय मन्नत कश्यपने ३ तर कनिका आहुजाने २ विकेट्स घेतल्या.

Story img Loader