कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारत अ संघाने आपल्या दौऱ्याची सुरुवात विजयाने केली आहे. इंग्लंड अध्यक्षीय संघाविरोधात पहिल्या वन-डे सामन्यात भारत अ संघाने १२५ धावांनी विजय मिळवला आहे. कर्णधार श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ आणि इशान किशन यांनी केलेली अर्धशतक भारतीय फलंदाजीचं प्रमुख वैशिष्ट्य ठरली. पृथ्वी शॉच्या ७०, श्रेयस अय्यरच्या ५४ तर इशान किशनच्या ५० धावांच्या जोरावर भारत अ संघाने ३२८ धावांपर्यंत मजल मारली. यानंतर इंग्लंड अध्यक्षीय संघाला ३६.५ षटकात २०३ धावांवर बाद करत दौऱ्यातील पहिला विजय संपादित केला. दिपक चहरने ४८ धावांमध्ये ३ गडी बाद केले.

भारत अ, इंग्लंड लायन्स आणि वेस्ट इंडिज अ या संघांमध्ये २२ जूनपासून तिरंगी वन-डे मालिका सुरु होणार आहे. या स्पर्धेआधी खेळवण्यात आलेल्या पहिल्याच सामन्यात भारताने मिळवलेला हा विजय त्यांना पुढील स्पर्धेसाठी आत्मविश्वास देणारा ठरेल. जुलै महिन्यात भारत अ संघ इंग्लंड लायन्स आणि वेस्ट इंडिज अ संघाविरुद्ध अनौपचारिक कसोटी सामनाही खेळणार आहे.

रविवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात इंग्लंड अध्यक्षीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर मयांक अग्रवाल अवघ्या ४ धावांवर माघारी परतला, मात्र त्याचा साथीदार पृथ्वी शॉ हा चांगल्या फॉर्मात दिसत होता. इशान किशन आणि श्रेयस अय्यर या जोडीने केलेल्या ९९ धावांच्या भागीदारीमुळे भारतीय संघाच्या धावसंख्येला खरा आकार दिला. संजू सॅमसन यो-यो फिटनेस चाचणीत नापास ठरल्यामुळे इशान किशनला भारत अ संघात जागा देण्यात आली होती. या संधीचा इशान किशनने पुरेपूर फायदा उचलल्याचं दिसतंय.

Story img Loader