श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत अ संघाने अखेरच्या अनौपचारिक वन-डे सामन्यात बाजी मारली आहे. दक्षिण आफ्रिका अ संघावर ३६ धावांनी मात करत भारत अ संघाने मालिकेत ४-१ ने बाजी मारली आहे. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना भारताने २० षटकांत २०४ धावांपर्यंत मजल मारली होती. या धावसंख्येचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ १६८ धावांपर्यंत मजल मारु शकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अखेरच्या सामन्यातही पावसाने आणलेल्या व्यत्ययामुळे सामना २० षटकांचा खेळवण्यात आला. सलामीवीर शिखर धवन आणि यष्टीरक्षक संजू सॅमसन यांनी आक्रमक अर्धशतकी खेळी करत भारतीय संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. शिखर धवनने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावलं. आफ्रिकन गोलंदाजांचा समाचार घेताना शिखरने ३६ चेंडूत ५१ धावा केल्या. या खेळीत ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.

दुसरीकडे संजू सॅमसननेही आफ्रिकेच्या गोलंदाजांची पिसं काढली. चौकार-षटकारांची आतिषबाजी करत सॅमसनने ९१ धावा फटकावल्या. या खेळीत सॅमसनने ६ चौकार आणि ७ षटकार लागवले. हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल जोडीने भारताला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. आफ्रिकेकडून रेझा हेंड्रीग्जने २ तर लिंडेने २ बळी घेतले.

प्रत्युत्तरादाखल आफ्रिकेच्या संघाची सुरुवात खराब झाली. शार्दुल ठाकूरने मलानला कर्णधार श्रेयस अय्यरच्या जागी झेल द्यायला भाग पाडलं. मात्र रेझा हेंड्रीग्जने मधल्या फळीतल्या फलंदाजांना सोबत घेऊन आफ्रिकेचा डाव सावरला. हेंड्रिग्जने ५९ धावा केल्या. मात्र तळातल्या फलंदाजांनी एकामागोमाग एक विकेट फेकत भारताला सामना बहाल केला. अखेरीस ३६ धावांनी सामन्यात बाजी मारत भारताने मालिका ४-१ ने जिंकली. भारताकडून अखेरच्या वन-डे सामन्यात शार्दुल ठाकूरने ३, वॉशिंग्टन सुंदरने २ तर इशान पोरेल, तुषार देशपांडे, राहुल चहर आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.