बीसीसीआयच्या निवड समितीने दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध चार दिवसीय कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. विंडीज दौऱ्यात भारत अ संघाकडून चांगली कामगिरी केल्यानंतरही, भारतीय संघात स्थान न मिळालेल्या शुभमन गिलवर यंदा निवड समितीने मोठी जबाबदारी टाकली आहे. आफ्रिका अ संघाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात शुभमन गिल भारत अ संघाचं नेतृत्व करणार आहे. ९ सप्टेंबरपासून तिरुअनंतपुरम येथे पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. याचसोबत १७ सप्टेंबरपासून मैसूर येथे खेळवण्यात येणाऱ्या दुसऱ्या सामन्यासाठी यष्टीरक्षक वृद्धीमान साहाकडे भारताचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे.
दोन्ही कसोटी सामन्यांसाठी निवड समितीने वेगवेगळ्या खेळाडूंना संधी दिली आहे. सध्या सुरु असलेल्या दुलिप करंडक स्पर्धेत अंतिम सामना खेळणाऱ्या खेळाडूंना दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात जागा देण्यात आली आहे.
पहिल्या ४ दिवसीय कसोटी सामन्यासाठी असा असेल भारत अ संघ –
शुभमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अनमोलप्रीत सिंह, रिकी भुई, अंकित बावने, के.एस. भारत (यष्टीरक्षक), कृष्णप्पा गौथम, शाहबाज नदीम, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, तुषार देशपांडे, शिवम दुबे, विजय शंकर
दुसऱ्या ४ दिवसीय कसोटी सामन्यासाठी असा असेल भारत अ संघ –
प्रियांक पांचाळ, अभिमन्यू इश्वरन, शुभमन गिल, अनमोलप्रीत सिंह, करुण नायर, वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक आणि कर्णधार), कृष्णप्पा गौथम, कुलदीप यादव, शाहबाज नदीम, विजय शंकर, शिवम दुबे, उमेश यादव, मोहम्मद सिराज, आवेश खान