भारताच्या अ संघाने इंग्लंड दौऱ्यात चमकदार कामगिरी करत लेस्टरशायरवर २८१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. ४५९ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेला लेस्टरशायरचा संपूर्ण संघ फक्त १७७ धावांवर माघारी परतला. भारताच्या या दिमाखदार विजयाचे शिल्पकार ठरले ते मुंबईकर पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल. या दोघांच्या शतकी खेळीच्या आधारावर भारत अ संघाने ४५८ धावांचा डोंगर उभा केला होता.
भारताचा अ संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून मंगळवारी संघाचा सामना लेस्टरशायरशी झाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल या सलामीवीरांनी दमदार सुरुवात करुन दिली. पृथ्वी शॉने ९० चेंडूत १३२ धावा चोपल्या. यात २० चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. तर मयांक अग्रवालने १०६ चेंडूत १५१ धावा केल्या. यात १८ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. या जोडीने पहिल्या विकेटसाठी २२१ धावांची भागीदारी रचली. शुभम गिलची ५४ चेंडूत ८६ धावांची खेळी आणि तर दीपक हुडाच्या नाबाद ३८ धावांच्या खेळीने भारताच्या अ संघाने ५० षटकांत चार विकेटच्या मोबदल्यात ४५८ धावांचा डोंगर उभा केला. अ श्रेणीच्या क्रिकेट इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली.
फलंदाजीला उतरलेल्या लेस्टरशायरची सुरुवात चांगली झाली. मात्र, संघाच्या ४४ धावा झाल्या असताना भारतीय गोलंदाजांनी सलामीची जोडी फोडली आणि यानंतर लेस्टरशायरचा डाव गडगडला. कर्णधार टॉम वेलची ६२ धावांची खेळी वगळता अन्य फलंदाज झटपट माघारी परतले. लेस्टरशायरचा डाव ४०. ४ षटकांत १७७ धावांवर आटोपला. भारतातर्फे दीपक चहरने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.