IND vs PAK Emerging Asia Cup 2024 Live Streaming: क्रिकेटमधील कट्टर प्रतिस्पर्धी असलेले संघ भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अटीतटीचा सामना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. हा चुरशीचा सामना इमर्जिंग आशिया कपमध्ये होणार आहे. भारत अ संघ पाकिस्तान अ विरूद्धच्या सामन्याने या स्पर्धेच्या मोहिमेला सुरूवात करणार आहे. भारत,पाकिस्तानव्यतिरिक्त आठ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहे. भारत-पाकिस्तान अ संघाचा हा सामना ओमान क्रिकेट अकादमी मैदानावर होणार आहे, जे मस्कत ओमान येथे आहे.

इमर्जिंग आशिया कप स्पर्धेची सुरूवात १८ ऑक्टोबरला हाँगकाँग विरूद्ध बांगलादेश या सामन्याने झाली. सलामीच्या सामन्यात बांगलादेश अ संघाने ५ गडी राखून विजय मिळवला. भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता हा सामना सुरू झाला होता. पहिल्या दिवशी श्रीलंका अ आणि अफगाणिस्तान अ यांच्यातही सामना खेळवला गेला, यात अफगाणिस्तानच्या अ संघाने शानदार विजय मिळवला. आठ संघांना दोन गटांमध्ये विभागले गेले आहे. अ गटात बांगलादेश अ, अफगाणिस्तान अ, श्रीलंका अ आणि हाँगकाँग हे देश आहेत. तर ब गटात भारत अ, पाकिस्तान अ, ओमान आणि युएई हे देश आहेत.

हेही वाचा – IND vs NZ: भारतीय संघाने घडवला इतिहास, १४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ

भारत अ आणि पाकिस्तान अ हे दोन्ही संघ एकाच गटात आहेत. दोन्ही गटातील अव्वल २ संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. पहिल्या उपांत्य फेरीत, अ गटातील पहिल्या स्थानावरील संघाचा सामना ब गटातील दुसऱ्या स्थानावरील संघाशी होईल. दुसऱ्या उपांत्य फेरीत, ब गटातील पहिल्या स्थानावर असलेल्या संघाचा सामना अ गटातील दुसऱ्या स्थानावरील संघाशी होईल. दोन्ही उपांत्य फेरीचे सामने २५ ऑक्टोबरला होतील.

तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील भारत अ आपला दुसरा सामना २१ ऑक्टोबर रोजी यूएई विरुद्ध आणि शेवटचा सामना २३ ऑक्टोबर रोजी ओमान विरुद्ध खेळेल. दरम्यान, मोहम्मद हरिसच्या नेतृत्वाखाली १५ सदस्यीय पाकिस्तान अ संघ २१ ऑक्टोबर रोजी यजमान ओमानशी भिडणार आहे. त्यानंतर, २३ ऑक्टोबर रोजी युएईविरुद्ध तिसरा गट सामना खेळेल.

हेही वाचा – Sarfaraz Khan Maiden Century: कष्टाचं चीज झालं! सर्फराझ खानने झळकावलं पहिलं कसोटी शतक, खास सेलिब्रेशनचा VIDEO होतोय व्हायरल

भारत अ संघाचे इमर्जिंग आशिया कपमधील वेळापत्रक

भारत अ वि पाकिस्तान अ – १९ ऑक्टोबर – संध्याकाळी ७ वाजता
भारत अ वि युएई – २१ ऑक्टोबर – संध्याकाळी ७ वाजता
भारत अ वि ओमान – १९ ऑक्टोबर – संध्याकाळी ७ वाजता

इमर्जिंग आशिया कपमधील भारत अ व पाकिस्तान अ यांच्यातील सामना १९ ऑक्टोबर म्हणजे आज संध्याकाळी ७ वाजता होणार आहे. तर मोठी गोष्ट म्हणजे इमर्जिंग आशिया कपचे लाईव्ह प्रक्षेपण कोणत्याही स्पोर्ट्स चॅनेलद्वारे टीव्हीवर टेलिकास्ट होणार नाही. पण या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग फॅनकोड या अ‍ॅपवर पाहता येईल.

Story img Loader