थिरूवनंतपुरम : भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ संघांमधील पाच एकदिवसीय सामन्यांच्या अनधिकृत मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होत असून सर्वाच्या नजरा युवा फलंदाज शुभमन गिलच्या कामगिरीकडे लागल्या आहेत.

शुभमन गिलने नुकत्याच संपलेल्या कॅरेबियन दौऱ्यात भारत अ संघाकडून खेळताना शानदार कामगिरी केली. मात्र तरीही त्याला भारताच्या एकदिवसीय संघात स्थान मिळू शकले नाही. आता दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध पुन्हा एकदा आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी शुभमनला मिळाली आहे. पायाच्या दुखापतीतून सावरलेला विजय शंकर हासुद्धा निवड समितीच्या रडारवर असणार आहे.

दुखापतीमुळे इंग्लंडमधील विश्वचषक स्पर्धा अर्धवट सोडून शंकरला माघारी परतावे लागले होते. मात्र तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये शंकरने पुनरागमन केले. त्यामुळे दमदार कामगिरी करून निवड समितीचे लक्ष वेधून घेण्यासाठी तो प्रयत्नशील आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारा मनीष पांडे पहिल्या तीन सामन्यांत नेतृत्व सांभाळत असून नंतरच्या दोन सामन्यांत श्रेयस अय्यरकडे कर्णधारपदाची जबाबदारी असेल.

भारतीय संघात मधल्या फळीत स्थान मिळवण्यासाठी पांडेला मोठी खेळी करावी लागणार आहे. यजुर्वेद्र चहल, कृणाल पंडय़ा यांच्यासह इशान किशन, ऋतुराज गायकवाड आणि नितीश राणा हे युवा खेळाडू भारत अ संघाकडून खेळणार असून आपली छाप पाडण्यासाठी ते उत्सुक आहेत.

सामन्याची वेळ : सकाळी ९ वा.

Story img Loader