भारतीय संघात पुनरागमनासाठी प्रयत्नशील असलेले वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर हे पुन्हा एकदा लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. वेस्ट इंडिज ‘अ’ आणि भारत ‘अ’ यांच्यातील दुसऱ्या सामन्यात गंभीरला ११ तर चौथ्या क्रमांकाला फलंदाजीला उतरणाऱ्या सेहवागला फक्त ७ धावाच करता आल्या आहेत. वेस्ट इंडिजने दोन अर्धशतकांच्या जोरावर पहिल्या डावात ४०६ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर भारतीय संघाने व्ही. ए. जगदीश आणि अभिषेक नायर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दुसऱ्या दिवसअखेर ३ बाद १९१ अशी मजल मारली होती.
बुधवारच्या ६ बाद २८३या धावसंख्येवरून पुढे खेळताना लिऑन जॉन्सन आणि नीकिता मिलर यांच्या खेळींच्या जोरावर ४०६ धावा केल्या. जॉन्सनने १६ चौकारांच्या जोरावर ९१ धावांची, तर मिलरने ८ चौकारांच्या जोरावर नाबाद ६४ धावांची खेळी साकारली. डावखुरा गोलंदाज भार्गव भट्टने ११३ धावांमध्ये सात फलंदाजांना बाद केले.
भारतीय संघाच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. गंभीर आणि सेहवाग या दोघांनाही पीरमॉलने बाद करत भारताला दुहेरी धक्के दिले. पण सलामीवीर जगदीश आणि अभिषेक नायर यांनी संघाचा डाव सावरला. जगदीशने ८ चौकारांच्या जोरावर नाबाद ७९ धावांची खेळी साकारली, तर नायरने ७ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३८ चेंडूंत नाबाद ५६ धावांची तडाखेबंद खेळी साकारली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा