पीटीआय, रांची : दीपक चहरच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघापुढील अडचणी वाढल्या असल्या, तरी रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कामगिरीत सुधारणा करून विजय मिळवण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला नऊ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला दुसऱ्या सामन्यात विजय अनिवार्य आहे.

पहिल्या सामन्यात आघाडीच्या फळीतील फलंदाजांच्या अपयशाचा भारतीय संघाला फटका बसला. कर्णधार शिखर धवन आणि शुभमन गिल ही सलामीची जोडी प्रत्येकी पाच धावांचा टप्पाही पार करू शकली नाही. भारतीय संघाला या दोघांकडून अधिक धावांची अपेक्षा आहे. श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन यांनी झुंजार अर्धशतके साकारत भारताला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजीत मोहम्मद सिराज आणि आवेश खान यांनी निराशा केली. त्यामुळे बंगालचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला संधी देण्याचा भारतीय संघ विचार करू शकेल. दुसरीकडे, आफ्रिकेच्या फलंदाजीची डेव्हिड मिलर आणि क्विंटन डीकॉक यांच्यावर, तर गोलंदाजीची कॅगिसो रबाडा आणि केशव महाराजयांच्यावर भिस्त असेल. 

चहरच्या जागी सुंदर

आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांसाठी जायबंदी दीपक चहरच्या जागी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात चहरच्या पाठीला दुखापत झाली. त्यामुळे त्याला पहिल्या एकदिवसीय सामन्याला मुकावे लागले होते. आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) दाखल होणार आहे, असे ‘बीसीसीआय’कडून सांगण्यात आले.

  • वेळ : दु. १.३० वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी

Story img Loader