भारताचे वेगवान गोलंदाज प्रत्येक लढतीत २० बळी मिळवून दक्षिण आफ्रिकेत प्रथमच कसोटी मालिका जिंकवून देण्यात मोलाची भूमिका बजावतील, अशी आश्वासक प्रतिक्रिया अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने व्यक्त केली.

भारत-आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला २६ डिसेंबरपासून प्रारंभ होत असून यासाठी भारतीय संघाचा सराव सुरू झाला आहे. आफ्रिकेत भारताने आजपर्यंत एकदाही कसोटी मालिका जिंकलेली नाही.

‘‘यंदा आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका जिंकण्यात आम्ही नक्कीच यशस्वी होऊ. वेगवान गोलंदाजी आमची ताकद असून त्यांच्यात प्रत्येक सामन्यात २० बळी मिळवण्याची क्षमता आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड दौऱ्यात वेगवान गोलंदाजांमुळेच आम्ही यश संपादन केले,’’ असे ३३ वर्षीय पुजारा म्हणाला. जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा, उमेश यादव आणि शार्दूल ठाकूर असे वेगवान गोलंदाज भारताच्या ताफ्यात आहेत.

पुजाराच्या भारतीय संघातील स्थानावर गेल्या काही काळापासून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहे, परंतु ९२ कसोटींत ६,५८९ धावा करणारा पुजारा आफ्रिका दौऱ्यात चमकदार कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

जैव-सुरक्षा परीघ संघासाठी लाभदायी

जवळपास दोन वर्षांपासून क्रीडापटूंना जैव-सुरक्षित वातावरणात खेळावे लागत आहे. परंतु जैव-सुरक्षा परिघात राहिल्याने खेळाडूंमधील नाते अधिक घट्ट झाले आहे, असे पुजाराला वाटते. ‘‘जैव-सुरक्षा परिघात दीर्घकाळ राहणे नक्कीच आव्हानात्मक आहे, परंतु यामुळे संघातील खेळाडू एकमेकांच्या अधिक जवळ आले आहेत. सरावापासून ते फावल्या वेळेतही सर्व खेळाडू एकत्रच असल्याने संघात सकारात्मकता टिकून राहते,’’ असे पुजाराने नमूद केले.