पाचवा गोलंदाज अथवा अतिरिक्त फलंदाज खेळवण्याचा कोहलीपुढे पेच

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी एका आठवड्याहून कमी अवधी शिल्लक आहे. त्यामुळे भारतीय संघ कोणत्या ११ खेळाडूंसह मैदानात उतरणार यासंबंधीच्या चर्चांना आता उधाण आले आहे. शार्दूल ठाकूरच्या स्वरूपात पाचवा गोलंदाज खेळवावा की अनुभवी र्अंजक्य रहाणेला संधी देऊन फलंदाजी अधिक बळकट करावी, असा पेच कर्णधार विराट कोहलीपुढे उभे ठाकला आहे.

सेंच्युरिअन येथे २६ डिसेंबरपासून उभय संघांतील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला प्रारंभ होईल. राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षणाखालील भारतीय संघ सध्या सुपरस्पोर्ट पार्क येथील मुख्य खेळपट्टीवर सराव करत आहे. त्यामुळे भारताला परिस्थितीशी जुळवून घेण्याबरोबरच खेळपट्टीनुसार आधीच अंतिम ११ खेळाडूंची निवड करणे सोपे ठरू शकते.

कसोटी जिंकण्यासाठी २० बळी मिळवण्याचे महत्त्व कोहलीला ठाऊक असल्याने त्याने नेहमीच पाच गोलंदाजांना खेळवण्यास प्राधान्य दिले आहे. परंतु विदेशी खेळपट्ट्यांवर प्रामुख्याने पहिल्या कसोटीत भारताची फलंदाजी ढेपाळण्याची भीतीही असते. त्यातच रोहित शर्मा, रवींद्र जडेजा यांच्या अनुपस्थितीत कोहली, चेतेश्वर पुजारा यांच्यावर फलंदाजीत अधिक दडपण येऊ शकते. त्यामुळे सहाव्या, सातव्या क्रमांकावर रहाणेला संधी देण्याचा पर्याय कोहलीपुढे आहे.

‘‘आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने शार्दूलला पाचवा गोलंदाज म्हणून खेळवावे. यामुळे सातव्या क्रमांकावरील फलंदाजाचा प्रश्नही मिटेल. जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विन या गोलंदाजांच्या पंचकासह भारताने मैदानात उतरावे,’’ असा सल्ला राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी दिला आहे.

मुंबईकर ३० वर्षीय शार्दूलला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. इंग्लंड दौऱ्यावर शार्दूलने अष्टपैलू चमक दाखवली. दुसरीकडे उपकर्णधारपद गमावलेल्या मुंबईच्याच ३३ वर्षीय रहाणेचे संघातील स्थानही डळमळीत असून श्रेयस अय्यर पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची दाट शक्यता आहे. हनुमा विहारीलाही अतिरिक्त फलंदाज म्हणून खेळवण्याचा विचार संघ व्यवस्थापन करू शकतो.

पहिल्या कसोटीसाठी प्रेक्षकांना बंदी?

जोहान्सबर्ग : करोनाचा नवा उत्परिवर्तित विषाणू ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारत-आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीसाठी प्रेक्षकांना प्रवेशबंदी करण्यात येऊ शकते. तेथील शासनाने दिलेल्या परवानगीनुसार फक्त २,००० हजार चाहत्यांनाच स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची मुभा आहे, परंतु आफ्रिका क्रिकेट मंडळाने या सामन्यासाठी अद्याप तिकिटांची विक्री सुरू केलेली नाही. सामन्याच्या दोन दिवसांपूर्वी परिस्थितीचा आढावा घेऊन चाहत्यांबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आफ्रिका क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले.

Story img Loader