India and Australia face each other after 20 years in ODI World Cup final: १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या अंतिम फेरीत भारताचा सामना पाच वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत भारताने न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत कांगारू संघाने दक्षिण आफ्रिका संघाचा ३ गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय संघ चौथ्यांदा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे, तर कांगारू संघाने आठव्यांदा अंतिम फेरी गाठण्याचा मान मिळविला. आता पुढील विश्वविजेते होण्यासाठी दोन्ही संघांमध्ये स्पर्धा असेल तर दक्षिण आफ्रिका पुन्हा एकदा चोकर असल्याचे सिद्ध झाले. त्यांना विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आतापर्यंत एकदाही पोहोचता आले नाही.

अंतिम फेरीत भारताचा २० वर्षांनी होणार ऑस्ट्रेलियाशी सामना –

एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय संघ अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाशी भिडण्याची ही दुसरी वेळ असेल. यापूर्वी २००३ मध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले होते. त्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला होता. तेव्हा राहुल द्रविड त्या भारतीय संघाचा खेळाडू होता, आता २० वर्षानंतर राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. भारतीय भूमीवर एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दोन्ही संघ विजेतेपदासाठी प्रथमच आमनेसामने येतील. ऑस्ट्रेलियाकडून त्या पराभवाचा बदला घेण्याची टीम इंडियाकडे आता चांगली संधी आहे. तसेच २० वर्षांनंतर टीम इंडियाकडे वर्ल्ड कप फायनलमध्ये कांगारू टीमला पराभूत करण्याची चांगली संधी आहे. २००३ मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाकडून १२५ धावांनी पराभव झाला होता.

हेही वाचा – World Cup 2023: फायनलमध्ये राहुल द्रविड टीम इंडियाला शेवटचे कोचिंग करताना दिसणार? मोठी अपडेट आली समोर

विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील दोन्ही संघांची कामगिरी –

भारतीय संघाबाबत बोलायचे झाले, तर तो चौथ्यांदा फायनलमध्ये पोहोचला आहे, त्यापैकी गेल्या तीन फायनलमध्ये हा संघ दोनदा चॅम्पियन बनला आहे. तसेच एकदा पराभूत झाला आहे. भारतीय संघ १९८३ मध्ये पहिल्यांदा फायनलमध्ये पोहोचला होता आणि चॅम्पियन बनला होता, तर दुसऱ्यांदा हा संघ २००३ मध्ये फायनलमध्ये पोहोचला होता, पण तिथे कांगारू टीमकडून पराभव पत्करावा लागला होता. यानंतर टीम इंडियाने २०११ मध्ये अंतिम फेरी गाठली आणि दुसऱ्यांदा चॅम्पियन होण्याचा मान मिळविला.

हेही वाचा – VIDEO: ‘मुंबई का भाई कौन? रोहित-रोहित’; टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी

आता टीम इंडियाला तिसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियन संघ आठव्यांदा फायनलमध्ये पोहोचला आहे. जर शेवटच्या ७ फायनलबद्दल बोलायचे, तर हा संघ ५ वेळा चॅम्पियन बनला आणि दोनदा उपविजेता ठरला आहे. कांगारू संघाने १९८७, १९९९, २००३, २००७, २०१५ मध्ये विश्वचषक जिंकला होता, तर या संघाला १९७५ आणि १९९६ मध्ये अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. कांगारू संघाला पुन्हा एकदा विक्रमी सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याची संधी मिळणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India and australia face each other after 20 years in odi world cup final 2023 vbm