भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आज मालिकेतील अखेरचा ट्वेन्टी-२० सामना

पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट लढतीत भारताने, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने वर्चस्व राखले. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना पाहण्यासाठी क्रिकेटविश्व आतुर असेल. दुसऱ्या सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला भारतीय संघ व्यवस्थापनाने सहाव्या स्थानावर फलंदाजीला पाठवले होते; पण तरीही धोनीने आक्रमक फटकेबाजी करत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे भारताला जर हा निर्णायक सामना जिंकायचा असेल तर भारताला धोनीच्या फलंदाजी स्थानावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे म्हटले जात आहे; पण या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे म्हटले जात असून या सामन्याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका सध्याच्या घडीला १-१ अशी बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा सामना जो जिंकेल त्यांना मालिका खिशात टाकता येईल. गेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या कॉलिन मुन्रो आणि ट्रेंट बोल्ट यांनी चमकदार कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. भारताकडूनही चांगला प्रतिकार झाला असला तरी त्यांना न्यूझीलंडचे आव्हान गाठता आले नव्हते.

दुसऱ्या सामन्यात कोहलीने अर्धशतकी खेळी साकारली होती, तर धोनीनेही त्याला आक्रमक खेळी साकारत चांगली साथ दिली होती; पण या आजी-माजी कर्णधारांना संघाला विजय मिळवून देता आला नव्हता. रोहित शर्मा, शिखर धवन आणि हार्दिक पंडय़ा हे बिनीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले होते. त्यामुळे भारताला हा सामना जिंकायचा असेल तर संघाला फलंदाजीवर अधिक भर द्यावा लागेल. त्याचबरोबर न्यूझीलंडच्या बोल्टचा सामना कसा करायचा, याची रणनीतीही त्यांना आखावी लागेल. भारताच्या गोलंदाजांनी सातत्यपूर्ण चांगला मारा केला आहे. भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेल यांच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा संघाला असेल.

बोल्ट हा न्यूझीलंडच्या गोलंदाजीतील प्रमुख अस्त्र आहे. भारताच्या आतापर्यंतच्या दौऱ्यात बोल्टने सातत्यपणे भेदक मारा केला आहे. बोल्ट चांगला मारा करत असला तरी त्याला दुसऱ्या टोकाकडून चांगली साथ मिळताना दिसलेली नाही. जर दुसऱ्या टोकाकडून त्याला चांगली साथ मिळाली तर हा सामना न्यूझीलंडला जिंकता येऊ शकतो. गेल्या सामन्यात मुन्रोने दमदार शतक झळकावले होते, त्यामुळे या सामन्यात तो कशी फलंदाजी करतो, यावर साऱ्यांचे लक्ष असेल. मुन्रोबरोबरच मार्टिन गप्तिलही चांगल्या फॉर्मात आला आहे. आतापर्यंत गप्तिलला मोठी खेळी साकारता आली नाही. कर्णधार केन विल्यमसन आणि टॉम लॅथम यांच्याकडून संघाला मोठय़ा अपेक्षा असतील.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रित बुमराह, युजवेंद्र चहल, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, मनीष पांडे, हार्दिक पंडय़ा, अक्षर पटेल, लोकेश राहुल.

न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), टॉड अ‍ॅस्टल, ट्रेंट बोल्ट, टॉम ब्रूस, कॉलिन डी ग्रँडहोमी, मार्टिन गप्तिल, मॅट हेन्री, टॉम लॅथम, हेन्री निकोलस, अ‍ॅडम मिल्ने, कॉलिन मुन्रो, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, इश सोधी, टिम साऊदी.

सामन्याची वेळ : सायं. ७ वा.पासून.

प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर.

Story img Loader