India vs south Africa 1st T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान उद्यापासून (९ जून) पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेसाठी साधारण आठवड्यापूर्वीच कर्णधार टेम्बा बावुमाच्या नेतृत्त्वाखाली पाहुण्या दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल झालेला आहे. त्यांनी कसून सराव देखील केला आहे. गुरुवारी होणाऱ्या पहिल्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण १५ वेळा समोरासमोर आले आहेत. यामध्ये भारताने नऊ तर दक्षिण आफ्रिकेने सहा सामने जिंकले आहेत. या आकडेवारीचा विचार केला तर भारतीय संघाचे पारडे जड दिसत आहे. मात्र, घरच्या मैदानांवर भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कामगिरी फारशी चांगली नाही. आतापर्यंत भारतामध्ये दोन्ही संघ चारवेळा आपापसात लढले आहेत. यापैकी भारताला फक्त सामना जिंकण्यात यश आले आहे. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाने तीन सामने जिंकले आहेत. उद्याचा सामना जिंकला तर सलग १३ सामने जिंकण्याचा विक्रम भारताच्या नावे होईल.
हेही वाचा – विश्लेषण : कशी असेल आयपीएल माध्यम हक्कांची लिलाव प्रक्रिया, जाणून घ्या सविस्तर माहिती
भारतीय संघ सुमारे अडीच महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. भारताने आपला शेवटचा सामना १६ मार्च रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. यानंतर भारतीय खेळाडू आयपीएल खेळण्यात व्यस्त झाले होते. आता पुन्हा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आपला जोर दाखवण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहे. मात्र, उद्यापासून सुरू होणाऱ्या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय चमूसाठी वाईट बातमी मिळाली आहे. भारतीय संघाचा कर्णधार के एल राहुल जखमी झाल्यामुळे तो खेळू शकणार नाही. त्याच्या जागी ऋषभ पंतकडे संघाची धुरा असेल.
टी ट्वेंटी मालिकेसाठी निवडलेला भारतीय चमू : ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत(यष्टीरक्षक कर्णधार), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, केएल राहुल
टी ट्वेंटी मालिकेसाठी निवडलेला दक्षिण आफ्रिका चमू : टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक(यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी निगिडी, एनरिक नॉर्टजे, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, ट्रिसन स्टब्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, मार्को जॅन्सन