अर्जेटिनाच्या ब्यूनस आयर्स शहरात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) १२५व्या सत्राच्या पाश्र्वभूमीवर क्रीडा मंत्रालयाने कुस्तीला पूर्ण सदस्यत्व देऊन ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेतील मुख्य खेळांमध्ये समावेशाची मागणी केली.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सर्व सदस्यांना लिहिलेल्या पत्रात क्रीडा सचिव पी. के. देब यांनी म्हटले आहे की, ‘‘फ्री स्टाइल (पुरुष व महिला) आणि ग्रीको-रोमन या प्रकारच्या कुस्ती स्पर्धाचा १८९६मध्ये अ‍ॅथेन्सला झालेल्या पहिल्या आधुनिक ऑलिम्पिक स्पध्रेपासून मुख्य खेळांमध्ये समावेश होता. प्राचीन ऑलिम्पिकमध्येही कुस्तीचा समावेश होता. ऑलिम्पिकच्या मुख्य स्पर्धामधून कुस्तीला वगळणे हे परंपरेच्या विरोधातील आहे.’’
‘‘सध्यासुद्धा कुस्ती हा खेळ जगभरात लोकप्रिय आहे. २०१२मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कुस्ती प्रकारात ७१ देशांनी भाग घेतला होता. यावरूनच या खेळाची लोकप्रियता स्पष्ट होते,’’ असे देब यांनी म्हटले आहे.
‘‘२०२०मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये कुस्ती या खेळाचा मुख्य क्रीडा प्रकारांमध्ये समावेश न करण्याचा निर्णय आयओसीने घेतला आहे. त्यामुळे कुस्तीच्या भवितव्यापुढे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे,’’ असे पुढे म्हटले आहे.
१२ फेब्रुवारी २०१३ रोजी झालेल्या आयओसीच्या कार्यकारिणी मंडळाच्या बैठकीमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या अधिपत्याखालील कुस्तीचा २०२०च्या ऑलिम्पिकधील मुख्य खेळांमध्ये समावेश करण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासंदर्भात हे पत्र सादर करण्यात आले. त्यानंतर २० मे २०१३ रोजी रशियातील सेंट पीटर्सबर्गला झालेल्या ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये बेसबॉल/सॉफ्टबॉल, स्क्वॉश आणि कुस्तीचा २०२०च्या ऑलिम्पिकमध्ये अतिरिक्त खेळ म्हणून समावेश करण्यात येणार आहे.
आयओसीचे पूर्ण सदस्यत्व लाभलेले व्यक्ती ७ ते १० सप्टेंबरला ब्यूनस आर्यस येथे मतदान करून ऑलिम्पिकमधील २५ मुख्य खेळांशिवायच्या आणखी तीन खेळांचे स्थान ठरवतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा