ऑस्ट्रेलियाचा माजी विश्वविजेता कर्णधार रिकी पॉन्टिंगने विश्वचषकाच्या अंतिम फेरीसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांना पसंती दिली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये यंदाच्या विश्वचषकाचा अंतिम सामना रंगेल, असे मत पॉन्टिंगने व्यक्त केले आहे.
‘‘माझ्या मते भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये विश्वचषकाचा अंतिम सामना रंगेल. दोन्ही संघांची फलंदाजी भक्कम असून दोन आदर्शवत संघ अंतिम फेरीत येतील आणि चुरशीचा सामना रंगेल,’’ असे मत पॉन्टिंगने एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये व्यक्त केले.
विश्वचषकाविषयी पॉन्टिंग म्हणाला की, ऑस्ट्रेलियाचे युवा खेळाडू चांगल्या फॉर्मात आहेत. डेव्हिड वॉर्नर हा ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. न्यूझीलंडचा संघ ‘डार्क हॉर्स’ ठरू शकेल. त्यांना घरच्या वातावरणाचा फायदा मिळेल, त्याचबरोबर त्यांच्याकडे चांगले वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू आहेत. महेंद्रसिंग धोनी खेळाडूंचे व्यवस्थापन कसे करतो, हे महत्त्वाचे ठरेल.
२००३ साली आम्ही विश्वचषकाच्या अंतिम फेरीत रिकी पॉन्टिंगच्या सर्वोत्तम संघाकडून पराभूत झालो. पण सध्याचा भारतीय संघ दडपणाच्या ओझ्याखाली दबलेला दिसत नाही. जोहान्सबर्गचा सामना पराभूत झाल्यावर आमच्यावर टीका झाली, पण परिस्थिती बदललेली आहे. आता भारतीय संघाला दडपणाची सवय झाली आहे.
-सौरव गांगुली, भारताचा माजी कर्णधार
मी कपिल देवने १९८३चा प्रुडेन्शियल विश्वचषक उंचावल्याचे पाहिले, तेव्हा मला प्रेरणा मिळाली. त्यावेळी मी असा विचार केला की, सुनील गावस्कर आणि कपिल यांच्यासारख्या दिग्गजांचा भारतीय संघ वेस्ट इंडिजसारख्या अव्वल संघाला हरवू शकतो, तर मग श्रीलंकेलासुद्धा हे जमू शकते. त्यानंतर आम्ही १९९६चा विश्वचषक आम्ही जिंकून दाखवला,
-अर्जुना रणतुंगा, श्रीलंकेचा माजी कर्णधार
विश्वचषकाचे दडपण नेहमीच असते. आमच्या संघातील खेळाडू वेगवेगळ्या बेटांवरून आली होती, त्यांची संस्कृती भिन्न होती, पण इंग्लंड आणि भारत यांच्या बाबतीत असे नाही. जो चांगला खेळ करतो तोच जिंकतो. भारताने चांगला खेळ केला असून त्यांना विश्वचषक उंचावण्याची संधी असेल.
-क्लाइव्ह लॉइड, वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार