पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या ४ बाद २५५ धावा; ग्रीनचेही योगदान
वृत्तसंस्था, अहमदाबाद
India vs Australia Test Series डावखुरा सलामीवीर उस्मान ख्वाजाचा भक्कम बचाव भेदण्यात आणि त्याला अडचणीत टाकण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरले. ख्वाजाने २५१ चेंडूंत केलेल्या नाबाद १०४ धावांच्या खेळीमुळे गुरुवारपासून सुरू झालेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ४ बाद २५५ धावांपर्यंत मजल मारली.
बॉर्डर-गावस्कर करंडकासाठीच्या या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले होते. भारताचा कर्णधार रोहित शर्माने या मालिकेतील एकमेव शतक झळकावले होते. मात्र अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवरील खेळपट्टी सपाट असून पहिल्या दिवशी फलंदाजी करणे काहीसे सोपे जाईल, असा अंदाज चौथ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने व्यक्त केला होता. स्मिथचा हा अंदाज योग्य ठरला. विशेषत: भारताचे फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा (१/४९), रविचंद्रन अश्विन (१/५७) आणि अक्षर पटेल (०/१४) यांना खेळपट्टीकडून फारसे साहाय्य मिळाले नाही.
फिरकीविरुद्ध चाचपणाऱ्या ख्वाजाला काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघातून वगळण्यात आले होते. मात्र त्याने खेळात सुधारणा केली आणि श्रीलंका व पाकिस्तान दौऱ्यात मोठय़ा धावा केल्या. त्याने ही लय कायम राखली आहे.
स्मिथने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर ख्वाजा आणि ट्रॅव्हिस हेड (४४ चेंडूंत ३२) यांनी ६१ धावांची सलामी दिली. अश्विनने हेडला माघारी पाठवत ही जोडी फोडली. मग मोहम्मद शमीने मार्नस लबूशेनचा (३) त्रिफळा उडवत ऑस्ट्रेलियाला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु ख्वाजाने एक बाजू लावून धरताना स्मिथच्या (१३८ चेंडूंत ३८) साथीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. या दोघांनी संयमाने फलंदाजी करताना तिसऱ्या गडय़ासाठी ७९ धावांची भागीदारी रचली. अखेर जडेजाला ही जोडी फोडण्यात यश आले.
पीटर हॅण्डस्कॉमने (१७) काही चांगले फटके मारले, पण तो मोठी खेळी करणार नाही हे शमीने सुनिश्चित केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची ४ बाद १७० अशी स्थिती झाली. यानंतर ख्वाजाला अष्टपैलू कॅमरून ग्रीनची (६४ चेंडूंत नाबाद ४९) साथ लाभली. ख्वाजाने दिवसाच्या अखेरच्या षटकात शमीच्या गोलंदाजीवर चौकार मारत कसोटी कारकीर्दीतील १४वे शतक पूर्ण केले. त्याने या खेळीदरम्यान १५ चौकार मारले आहेत.
मी यापूर्वी दोन वेळा भारताच्या दौऱ्यावर आलो होतो आणि त्या दौऱ्यांतील आठ कसोटी सामन्यांत मला एकदाही संधी मिळाली नाही. मी मैदानावर अन्य फलंदाजांसाठी पेय घेऊन जात होतो. त्यामुळेच शतक पूर्ण झाल्यावर मी जोरात जल्लोष केला. माझ्या कृतीमागे खूप भावना होत्या. खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली आहे. खराब फटका मारून बाद व्हायचे नाही हे मी ठरवले होते. माझ्यासाठी हे मानसिक आव्हान होते.