वृत्तसंस्था, इंदूर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंदूर येथील होळकर स्टेडियमच्या फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंपुढे भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली. डावखुरा फिरकीपटू मॅथ्यू कुनमन (५/१६) आणि ऑफ-स्पिनर नेथन लायन (३/३५) यांच्या प्रभावी माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध बुधवारपासून सुरू झालेल्या तिसऱ्या कसोटीत भारताचा पहिला डाव १०९ धावांतच गडगडला. प्रत्युत्तरात पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची ४ बाद १५६ अशी धावसंख्या होती. त्यांच्याकडे पहिल्या डावात ४७ धावांची आघाडी होती.

यंदा बॉर्डर-गावस्कर करंडक मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच खेळपट्टय़ांबाबत बरीच चर्चा केली जात होती. नागपूर आणि दिल्ली येथे झालेल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांच्या खेळपट्टय़ा फलंदाजीसाठी काहीशा आव्हानात्मक होत्या. मात्र, इंदूरची खेळपट्टी या मालिकेतील फलंदाजीसाठी सर्वात अवघड असल्याचे तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसापासूनच जाणवले. खेळपट्टीवरील माती उडत होती, तसेच चेंडू फिरकी घेत होता.

या खेळपट्टीवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांनी योग्य टप्प्यावर मारा करताना भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकले. तसेच पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणाऱ्या स्टीव्ह स्मिथनेही गोलंदाजांचा योग्य वापर करतानाच क्षेत्ररक्षकांची अचूक रचना केली.

भारताने या सामन्यासाठी धावांसाठी झगडणाऱ्या केएल राहुलच्या जागी शुभमन गिलला संघात स्थान दिले. गिलने आक्रमक शैलीत खेळताना १८ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने २१ धावा केल्या. परंतु कर्णधार रोहित (१२) आणि गिल यांना सलग दोन षटकांत कुनमनने माघारी धाडले. कुनमनला लायनने उत्तम साथ देताना चेतेश्वर पुजारा (१) आणि रवींद्र जडेजा (४) यांचा अडसर झटपट दूर केला. कुनमनने मग श्रेयस अय्यरला खाते उघडण्याचीही संधी दिली नाही. त्यामुळे भारताची ५ बाद ४५ अशी स्थिती झाली. विराट कोहली (५२ चेंडूंत २२) आणि केएस भरत (३० चेंडूंत १७) यांनी काही चांगले फटके मारले. परंतु त्यांना अनुक्रमे टॉड मर्फी आणि लायन यांनी पायचीत पकडले. मग लयीत असलेल्या रविचंद्रन अश्विनला (३) कुनमनने बाद केले. उमेश यादवने दोन षटकार व एका चौकाराच्या मदतीने १३ चेंडूंत १७ धावा करताना भारताला १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. परंतु त्यालाही कुनमनने बाद करत कसोटी कारकीर्दीत प्रथमच एका डावात पाच बळी मिळवण्याची कामगिरी केली. अखेरीस मोहम्मद सिराज धावचीत झाल्याने भारताचा डाव १०९ धावांवर संपुष्टात आला. अक्षर पटेल १२ धावांवर नाबाद राहिला.

प्रत्युत्तरात डावखुरा फिरकीपटू जडेजाने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला (९) खेळपट्टीवर फार काळ टिकू दिले नाही. मात्र, यानंतर उस्मान ख्वाजा (१४७ चेंडूंत ६०) आणि मार्नस लबूशेन (९१ चेंडूंत ३१) यांनी अप्रतिम फलंदाजी केली. या दोघांनी ९८ धावांची भागीदारी रचताना ऑस्ट्रेलियाला भारताच्या धावसंख्येजवळ पोहोचवले. जडेजाने लबूशेनचा त्रिफळा उडवत ही जोडी फोडली. परंतु ख्वाजाने अर्धशतक पूर्ण करताना ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. जडेजाने ख्वाजा आणि स्मिथ (३८ चेंडूंत २६) यांना बाद करत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या मर्यादित ठेवली. दिवसअखेर पीटर हॅण्डस्कॉम (नाबाद ७) आणि कॅमरुन ग्रीन (नाबाद ६) खेळपट्टीवर होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India australia test series india first innings ended on 109 runs amy
Show comments