दुसरा डाव १६३ धावांत गडगडला; ऑस्ट्रेलियासमोर ७६ धावांचे किरकोळ लक्ष्य; लायनचे आठ बळी
पीटीआय, इंदूर : चेतेश्वर पुजाराचा अपवाद वगळता भारताचे फलंदाज ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावातही अपयशी ठरले. ऑफ-स्पिनर नेथन लायनच्या (८/६४) उत्कृष्ट माऱ्यापुढे भारताचा दुसरा डाव केवळ १६३ धावांत गडगडला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी केवळ ७६ धावांचे आव्हान मिळाले असून पहिल्या दोन कसोटी सामन्यांप्रमाणे या सामन्याचा निकालही अडीच दिवसांतच लागणे अपेक्षित आहे.
इंदूरच्या होळकर स्टेडियमवरील आव्हानात्मक खेळपट्टीवर दुसऱ्या दिवशीही गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला. भारताच्या पहिल्या डावातील १०९ धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा डाव १९७ धावांवर आटोपला. मात्र, त्यांना ८८ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवण्यात यश आले. भारताने दुसऱ्या डावातही सुरुवातीपासून ठरावीक अंतराने गडी गमावले. लायनने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकले. एका बाजूने गडी बाद होत असताना दुसऱ्या बाजूने पुजाराने (१४२ चेंडूंत ५९) संयमी खेळी केली. त्याने या खेळीदरम्यान पाच चौकार व एक षटकारही मारला. परंतु त्याच्या व्यतिरिक्त भारताचा एकही फलंदाज ३० धावा किंवा चेंडूंचा टप्पा ओलांडू शकला नाही.
भारताच्या दुसऱ्या डावात लायनने शुभमन गिल (५) आणि कर्णधार रोहित शर्मा (१२) यांना झटपट माघारी धाडले. विराट कोहलीने काही चांगले फटके मारले, पण १३ धावांवर त्याला मॅथ्यू कुनमनने पायचीत पकडले. रवींद्र जडेजा (७) लायनच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर श्रेयस अय्यरने आक्रमक शैलीत फलंदाजी करताना २७ चेंडूंत तीन चौकार व दोन षटकारांच्या मदतीने २६ धावा फटकावल्या. परंतु मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर उस्मान ख्वाजाने त्याचा अप्रतिम झेल पकडला. मग लायनने केएस भरत (३), अश्विन (१६) आणि उमेश यादव (०) यांना माघारी पाठवले. दरम्यान पुजाराने १०८ चेंडूंत मालिकेतील आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. परंतु ५९ धावांवर त्याचा लायनच्या गोलंदाजीवर ‘लेग-स्लीप’मध्ये उभ्या स्टीव्ह स्मिथने एका हातात उत्कृष्ट झेल पकडला. मग लायनच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मोहम्मद सिराज खातेही न उघडता बाद झाला आणि भारताचा डाव १६३ धावांवर संपुष्टात आला. अक्षर पटेल (१५) या डावातही नाबाद राहिला.
तत्पूर्वी, दिवसाच्या सुरुवातीला ४ बाद १५६ धावांवरून पुढे खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९७ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाचा संघ एकवेळ ४ बाद १८६ अशा सुस्थितीत होता. मात्र, त्यांनी यापुढे ११ धावांतच सहा गडी गमावले. वेगवान गोलंदाज उमेश यादव (३/१२) आणि ऑफ-स्पिनर अश्विन (३/४४) यांच्या प्रभावी माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. पीटर हॅण्डस्कॉम (१९) आणि कॅमरुन ग्रीन (२१) यांनाच काहीशी झुंज देता आली.
संक्षिप्त धावफलक
- भारत (पहिला डाव) : १०९
- ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ७६.३ षटकांत सर्वबाद १९७ (उस्मान ख्वाजा ६०, मार्नस लबूशेन ३१, स्टीव्ह स्मिथ २६; रवींद्र जडेजा ४/७८, उमेश यादव ३/१२, रविचंद्रन अश्विन ३/४४)
- भारत (दुसरा डाव) : ६०.३ षटकांत सर्वबाद १६३ (चेतेश्वर पुजारा ५९, श्रेयस अय्यर २६, रविचंद्रन अश्विन १६; नेथन लायन ८/६४, मिचेल स्टार्क १/१४, मॅथ्यू कुनमन १/६०)
लायनने कुंबळेचा विक्रम मोडला
नेथन लायनने भारताच्या दुसऱ्या डावात आठ गडी बाद करण्याची किमया साधली. यासह त्याने भारत-ऑस्ट्रेलिया या संघांमधील कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक बळींचा विक्रमही आपल्या नावे केला आहे. लायनने २५ सामन्यांत ११३ बळी मिळवले असून त्याने भारताचा दिग्गज लेग-स्पिनर अनिल कुंबळेचा (२० सामन्यांत १११ बळी) विक्रम मोडीत काढला.